कडेगाव तालुक्यातील कर्जाच्या थकबाकीत वाढ-: शेतकऱ्यांकडून ३८ कोटीचे देणे थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:39 AM2019-01-19T00:39:24+5:302019-01-19T00:39:53+5:30
शासनाची कर्जमाफी मिळणार, या आशेने कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेती व इतर कर्जाची थकबाकी ३८ कोटीच्या घरात पोहोचली आहे. दरवर्षी
अतुल जाधव ।
देवराष्ट्रे : शासनाची कर्जमाफी मिळणार, या आशेने कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेती व इतर कर्जाची थकबाकी ३८ कोटीच्या घरात पोहोचली आहे. दरवर्षी तालुक्यात सरासरी ६ कोटी रुपयांपर्यंत कर्जाची थकबाकी असायची; पण यावर्षी सरासरीपेक्षा ६ पटीने थकबाकी वाढली आहे.
तालुक्यात विविध कार्यकारी सर्व सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक तालुक्यातील शेतकºयांना ९० टक्के कर्ज पुरवठा करते. याच्यापाठोपाठ राष्ट्रीयीकृत बँक, नागरी सहकारी बँका, पतसंस्थांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले जाते.
तालुक्यातील ६४ पैकी ६० सोसायट्यांतून पीक कर्ज व मध्यम मुदत कर्जाचे वाटप केले जाते. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकºयांनी कर्ज भरणेच बंद केले. याचा परिणाम म्हणून कर्जाची थकबाकी यावर्षी सरासरीपेक्षा ६ पटीने वाढून ती ३८ कोटीच्या वर गेली आहे. कर्जमाफी मिळेल या आशेने शेतकºयांनी गेल्यावर्षीपासून कर्ज भरणे, नवीन कर्ज काढणे, व्याज भरणे बंद केल्याने थकीत बाकी मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे.
यातून कसा मार्ग काढावा, असा प्रश्न आता बँकांना पडला आहे.
जिल्हा बँक व सोसायटी माध्यमातून शेतकºयांना सामान्य कर्जाचे वाटप सुरु केले; पण हे कर्ज शेतीपूरक नसल्याने कर्जमाफी योजनेत सामान्य कर्ज बसत नसल्याचे दिसत आहे व या कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे, सध्या बँकेने या कर्जाचे वाटप बंद केले आहे.
माफीला सोकावला : व्याजाला मुकला
कर्जमाफी मिळणार म्हणून ज्या शेतकºयांनी पीक कर्जाची रक्कम थकवली आहे, त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कर्जमाफीला सोकावलेल्या शेतकºयांना शासनाच्या व्याज सवलतीला मुकावे लागणार आहे.
दुष्काळी गावात सक्तीची वसुली नाही
तालुक्यातील तेरा गावे दुष्काळी यादीत आहेत. त्यामध्ये नेवरी, आंबेगाव, येतगाव, तुपेवाडी, कान्हरवाडी, येवलेवाडी, हणमंतवडीये, तुपेवाडी खु, कोतीज, खेराडे विटा, खेराडे वांगी, भिकवडी, ढाणेवाडी या गावात कर्ज वसुलीची सक्ती होत नाही. मात्र इतर गावातही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी सोसायट्यांनी कर्जदारांना नोटीस पाठवली आहे व सक्तीची वसुली चालू केली आहे.