जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची वाढती रुग्णसंख्या चिंतनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:25 AM2021-05-24T04:25:46+5:302021-05-24T04:25:46+5:30
सांगली : कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या सध्या स्थिर असली तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. ...
सांगली : कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या सध्या स्थिर असली तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. म्युकरमायकोसिसचा धोका वाढत असल्याने निदान झालेल्या रुग्णांवर मध्यवर्ती ठिकाणीच उपचार व्हावेत, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, म्युकरमायकोसिस रुग्णांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. प्रशासनाने त्यांच्यावरील उपचारांचे नियोजन करावे. या रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टर्सना या आजाराचा धोका कमी करण्यासाठी कोणती अधिक काळजी घ्यावी, यासाठी ऑनलाइन वर्कशॉप घ्यावा. यामुळे इतर डॉक्टरांनाही याची माहिती होऊन रुग्णांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. आरोग्य यंत्रणेने म्युकरमायकोसिसची पुढील काळात रुग्णसंख्या कितीपर्यंत वाढू शकते याचा अंदाज घेत आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
चौकट
पालकमंत्री पाटील म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्यात ७२ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत. या सर्वांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे. खासगी रुग्णालयांनी कोविडसदृश रुग्ण आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक केल्याने त्याचा चांगला उपयोग होऊन अशा रुग्णांचा पुढील धोका टाळणे शक्य होणार आहे.