जतमध्ये अवकाळीचा डाळिंबांना फटका

By admin | Published: December 14, 2014 09:58 PM2014-12-14T21:58:59+5:302014-12-14T23:50:45+5:30

चुकीचे पंचनामे केल्याचा आरोप : शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित

Incredible pomegranate shaky | जतमध्ये अवकाळीचा डाळिंबांना फटका

जतमध्ये अवकाळीचा डाळिंबांना फटका

Next

दरीबडची : जत तालुक्यात गेल्या महिन्यामध्ये अवकाळीने तडाखा दिल्याने द्राक्ष, डाळिंबबागांना मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये बहरात आलेले डाळिंब पीक एका रात्रीत फुटून गेले. ७५ टक्क्यावर बागा तेल्याने (बिब्ब्या) गेल्या असताना, कृषी विभागाने चुकीचे आणि वस्तुस्थिती न पाहता पंचनामे करून द्राक्षे व डाळिंब बागांचे ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान क्षेत्र दाखविले आहे. नैसर्गिक संकटाबरोबर मानवनिर्मित चुकीच्या पंचनाम्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. द्राक्षे व डाळिंब फळबागांचे मोठे नुकसान झाले. दीड-दोन महिन्यात सलग दोन, तीनवेळा ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे डाळिंबावर तेल्या, तर द्राक्षावर दावण्याचा प्रादुर्भाव झाला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बागा बहरात आलेली डाळिंबं एका रात्रीत फुटून गेली.
तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ९ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. गणेश, केशर जातीच्या बागा आहेत. दुष्काळात पिचलेला आणि कर्जे काढलेला शेतकरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाने आर्थिक संकटात आला आहे. ज्या बागा फुलोऱ्यात (फ्लॉवरिंग स्टेज) होत्या, त्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० ते ६० टक्के द्राक्षघडांची गळ झाली आहे. दावण्याचा प्रादुर्भाव झाला आहे. ४४० हेक्टर द्राक्षबागांना फटका बसला आहे.
शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त डाळिंब, द्राक्षे फळबागांचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त बागांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे करण्याचा आदेश दिला होता. याबाबतचा अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यात मोठे नुकसान होऊनही डाळिंब, द्राक्ष या फळबागेचे ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बागांमध्ये न जाता, वस्तुस्थिती न पाहता पंचनामे कले आहेत. यामुळे पंचनामे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तालुक्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये अवकाळी ६ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनाम्याची जबाबदारी न घेतल्यामुळे सर्व कृषी सहायकांनी मिळून सर्व पंचनामे ५० टक्क्यापेक्षा कमी दाखविले आहेत. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीपासूनही या शेतकऱ्यांना चुकीच्या पंचनाम्यामुळे वंचित राहावे लागणार आहे. (वार्ताहर)

अवकाळीने नुकसान झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये


पीक५० टक्केपेक्षा कमीजास्तएकूण
डाळिंब१५८३.८९ हे.००२९७४.२१ हे.
द्राक्षे११५० हे. ००१५६७ हे.

अधिवेशनात आवाज उठविण्याची मागणी
निसर्गाबरोबरच कृषी विभागाच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे
बागायतदार शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे
लागणार आहे. कार्यालयात बसून पंचनामे करणाऱ्या कृषी
विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. ७५ टक्केपेक्षा जास्त द्राक्षे, डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. बोगस पंचनाम्यांविषयी आ. विलासराव जगताप यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवावा, अशी आमची मागणी आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर रेबगोंड यांनी सांगितले.

Web Title: Incredible pomegranate shaky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.