जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: सांगली जिल्ह्यातील २५ हजार शिक्षक, कर्मचारी संपावर
By अशोक डोंबाळे | Published: December 14, 2023 06:20 PM2023-12-14T18:20:16+5:302023-12-14T18:20:44+5:30
शासकीय कार्यालयांतील कामे ठप्प
सांगली : जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. याला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शासकीय कामे ठप्प झाली. अधिकाऱ्यांनी रजा टाकून आंदोलनास पाठींबा दिला आहे. जिल्ह्यातील २५ हजारांवर शिक्षक, कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा संघटनांनी दावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन सुरू केले असून, शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.
याबाबत माहिती अशी की, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही शासनाकडून डोळेझाक होत आहे. यासाठी गुरुवारपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांही करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. तसेच शिक्षकांचाही या संपात समावेश आहे. सुमारे २५ हजारांहून अधिक शिक्षक, कर्मचारी सहभागी आहेत. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. कामासाठी आलेल्या नागरिकांना माघारी जावे लागले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अधिकाऱ्यांनीही सामूहिक रजा टाकली आहे. तर काही संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काही कार्यालयात एखादा-दुसरा कर्मचारी काम करताना दिसून आला. तरीही दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. बहुतांशी कार्यालयांना टाळा लावला होता. तसेच संपाची माहिती असल्याने नागरिकही कमी प्रमाणात दिसून आले.