ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, सात महिन्यांपासून मानधनही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 12:59 PM2023-11-18T12:59:46+5:302023-11-18T13:00:09+5:30
परिचालकांच्या मागण्यांविषयी शासनाने लेखी व तोंडी आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलनाचा निर्णय
सांगली : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांनी शुक्रवारपासून (दि. १७) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. सर्व जिल्हाध्यक्षांच्या ऑनलाइन बैठकीत आंदोलनाचा निर्णय झाला. परिचालकांच्या मागण्यांविषयी शासनाने लेखी व तोंडी आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिचालकांच्या मागण्या अशा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दर्जा व किमान वेतन द्यावे, २० हजार रुपये मासिक मानधन मिळावे, टार्गेट पद्धती रद्द करावी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती द्यावी, सात महिन्यांपासूनचे प्रलंबित मानधन मिळावे.
यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेला व पंचायत समितीला निवेदने देण्यात आली आहेत. दरम्यान, परिचालकांच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतींचे सर्व ऑनलाइन कामकाज थांबले आहे. एखादा परिचालक काम करताना दिसल्यास त्याच्या घरी जाऊन गांधीगिरी करण्यात येणार आहे.
१०० टक्के परिचालक आंदोलनात
संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष रणजित पाटील यांनी सांगितले की, आंदोलनात जिल्ह्यातील १०० टक्के परिचालक सहभागी झाले आहेत. सात महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने आमची कौटुंबिक आर्थिक कोंडी झाली आहे. ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.