कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन
By संतोष भिसे | Published: June 25, 2023 04:07 PM2023-06-25T16:07:24+5:302023-06-25T16:07:57+5:30
आजवर दोन-तीनवेळा उपसाबंदी लागू करण्यात आली. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.
सांगली : कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रात एक टीएमसी पाणी सोडावे यासाठी मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे स्वतंत्र भारत पक्षाने बोंबाबोंब आंदोलन केेले.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविले. त्यात म्हटले आहे की, कृष्णेची पाणीपातळी महिनाभरापासून खालावली आहे. जलसंपदा विभागाकडे मागणी करूनही कोयना धरणातून पुरेसे पाणी सोडण्यात आलेले नाही.
आजवर दोन-तीनवेळा उपसाबंदी लागू करण्यात आली. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. महापालिका क्षेत्रात पाणीकपात करावी लागत आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. जिल्ह्याला अतिशय निष्क्रिय पालकमंत्री लाभले आहेत असेच म्हणावे लागते. शेतकऱ्यांच्या समस्याकडे ते गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत.
जिल्ह्यात आणखी १०-१५ दिवस पुरेशा पावसाची अनिश्चितता आहे. कृषी, औद्योगिक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन धरणातून पाणी सोडावे. दरम्यान, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी रविवारी कृष्णाकाठावर बोंबाबोंब आंदोलन केले. यामध्ये फराटे यांच्यासह दीपक लांडे, संतोष जवारे, रोहित आवटी, सुहास गाडवे, गणेश मदने, महेश कांबळे, अमर साळुंखे, राहुल पाटील, अनिकेत पाटील, सोन्या तेली, सागर कोरे आदींनी भाग घेतला.