रेल्वेचे स्त्रीदाक्षिण्य संपले, लेडीज स्पेशल डबे काढून टाकले!

By संतोष भिसे | Published: September 12, 2022 08:08 PM2022-09-12T20:08:05+5:302022-09-12T20:09:12+5:30

कोरोनानंतर उत्पन्नावर अधिकाधिक लक्ष केंद्रीत केलेल्या रेल्वेने तोट्यातील अनेक उपक्रम बंद केले आहेत.

indian railways removed ladies special coaches in kolhapur division | रेल्वेचे स्त्रीदाक्षिण्य संपले, लेडीज स्पेशल डबे काढून टाकले!

रेल्वेचे स्त्रीदाक्षिण्य संपले, लेडीज स्पेशल डबे काढून टाकले!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनानंतर उत्पन्नावर अधिकाधिक लक्ष केंद्रीत केलेल्या रेल्वेने तोट्यातील अनेक उपक्रम बंद केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एक्सप्रेस गाड्यांचे लेडीज स्पेशल डबेही काढून टाकले आहेत. महिलांना प्रवासासाठी आता स्वतंत्र डबा मिळत नाही.

देशभरातील मेल व एक्सप्रेस गाड्यांसाठी हा निर्णय लागू केला आहे. गाडीला सर्वांत शेवटी गार्डच्या डब्यालगत लेडीज स्पेशल डबा असायचा. एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना त्याचा मोठा आधार होता. शिवाय अन्य डब्यांतील गर्दीमध्ये जागा न मिळालेल्या महिला प्रवासीही लेडीज स्पेशल डब्याचे आरक्षण घेऊन प्रवास करायच्या. दिवसा धावणाऱ्या एक्सप्रेसमध्ये या डब्यांना विशेष गर्दी असायची. रात्री मात्र बहुतांश रिकामेच असायचे. लॉकडाऊननंतर रेल्वेने तोट्यातील उपक्रमांचा आढावा घेतला, त्यामध्ये रिकाम्या धावणाऱ्या लेडीज स्पेशल डब्यांवरही संक्रांत आली. सध्या सर्व मेल व एक्सप्रेचे हे डबे काढून टाकले आहेत. फक्त दिव्यांगांसाठीचा अर्धा डबा शिल्लक ठेवला आहे.

महिलांचा अल्प प्रतिसाद आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण यामुळे लेडीज स्पेशल डबा बंद केल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. लांब पल्ल्याच्या प्रवासात महिला सहसा एकटीने रेल्वेत येत नाहीत, पुरुष सोबत्यासोबत सर्वसामान्य डब्यातच बसतात. त्यामुळे लेडीज स्पेशल डबे रिकामेच धावायचे. महिलांसाठीच्या डब्यात गुन्हेगारी कृत्येही वारंवार होत असत. यामुळेच हे डबे बंदचा निर्णय रेल्वे बोर्डाला घ्यावा लागला. 

महिलांसाठी एक कुपे राखीव

मेल व एक्सप्रेस गाड्यांचा लेडीज स्पेशल डबा बंद केला असला, तरी स्लीपर डब्यातील आठ आसनांचा एक कुपे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आरक्षण फॉर्ममध्ये महिलांनी या कुपेसाठी विनंती केल्यास आसन प्राधान्याने दिले जाते.

कोयना एक्सप्रेस होती लोकप्रिय

कोल्हापूर ते मुंबईदरम्यान दिवसा धावणाऱ्या कोयना एक्सप्रेसमधील लेडीज स्पेशल डब्यांना मोठा प्रतिसाद होता. त्यांचे आरक्षण बारमाही फुल्ल असायचे. पण हे डबेदेखील काढून टाकले आहेत. सध्या राज्यात फक्त मुंबईतील लोकल गाड्यांनाच लेडीज स्पेशल डबे आहेत.

Web Title: indian railways removed ladies special coaches in kolhapur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.