आटपाडीत होणार गुरुवारपासून माणदेशी साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 07:13 PM2020-02-11T19:13:00+5:302020-02-11T19:15:47+5:30
कविसंमेलनाला माणदेशातील विविध नामवंत कवींना निमंत्रण दिले आहे. शनिवार, दि. १५ रोजी पदवीदान समारंभ आयोजित केला असून, प्रमुख पाहुणे इंद्रजित भालेराव आहेत. दरम्यान, आटपाडी तालुक्यातील सर्व गावात चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
आटपाडी : थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी आणि श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आटपाडीत गुरुवार, दि. १३ पासून ‘माणदेशी मराठी साहित्य संमेलन’ होणार आहे. ते तीनदिवसीय चालणार असून, साहित्यप्रेमींनी यात सहभागी होऊन आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार लोंढे यांनी केले.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आटपाडी यांनी संयुक्तपणे चौथ्या माणदेशी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. साहित्य परिषद, शाखा आटपाडीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि प्रा. विजयकुमार लोंढे निमंत्रक आहेत. गुरुवार, दि. १३ रोजी ‘फनी गेम्स व पारंपरिक वेशभूषा’चे आयोजन केले आहे. शुक्रवार, दि. १४ रोजी ग्रंथदिंडीचे आयोजन केले आहे. ग्रंथदिंडीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे असून, यावेळी प्रा. विजय लोंढे, मोठे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच ग्रंथ प्रदर्शनही आयोजित केले आहे. याचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. सुभाष कारंडे यांच्याहस्ते केले जाणार आहे. दुपारी बारा वाजता ‘साहित्य संमेलन व ग्रंथ प्रकाशन सोहळा’ आयोजित केला आहे.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन तहसीलदार सचिन लंगोटे यांच्याहस्ते केले जाणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रणधीर शिंदे, तर स्वागताध्यक्ष अमरसिंह देशमुख आहेत. यावेळी अनेक ग्रंथांचे प्रकाशन केले जाणार आहे. यामध्ये ‘प्रकाशनाच्या वाटेवर’, ‘माणमुद्रा’, ‘गदिमा मंतरलेले चैत्रबन’ या पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. सायंकाळच्या सत्रात माणदेशी साहित्यावर परिसंवादाचे आयोजन केले असून, अध्यक्षस्थानी प्रा. कृष्णा इंगवले असून, यामध्ये प्रा. सयाजीराजे मोकाशी, डॉ. शामसुंदर मिरजकर, डॉ. दत्ता घोलय, विश्वनाथ जाधव सहभागी होणार आहेत. यानंतर कविसंमेलन आयोजित केले आहे.
कविसंमेलनाला माणदेशातील विविध नामवंत कवींना निमंत्रण दिले आहे. शनिवार, दि. १५ रोजी पदवीदान समारंभ आयोजित केला असून, प्रमुख पाहुणे इंद्रजित भालेराव आहेत. दरम्यान, आटपाडी तालुक्यातील सर्व गावात चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.