अठरा वर्षांवरील व्यक्तींना एक मेपासून लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:19 AM2021-04-29T04:19:54+5:302021-04-29T04:19:54+5:30
सांगली : केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे दि. १ मेपासून १८ ते ४५ वयोगटास कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येणार ...
सांगली : केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे दि. १ मेपासून १८ ते ४५ वयोगटास कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येणार होते. मात्र, सध्या लसींची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करता येणार नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
लसीकरणाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, सध्या लसीची उपलब्धता मर्यादित असली तरीही ४५ वर्षांवरील लसीकरण सुरू आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना वेळेतच दुसरा डोस मिळणेही आवश्यक आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील वयोगटासाठी १ मे नंतरही नियमित लसीकरण सुरू राहणार आहे. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतरच १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
१८ ते ४५ या वयोगटात लोकसंख्या मोठी असल्याने लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होणार आहे. ही गर्दी टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यानंतर केंद्रांची संख्या वाढवून लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चौकट
लसीकरण केंद्रावर गर्दी नको
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. तरीही लसीकरण केंद्रावर मात्र गर्दी होत आहे. १८ वर्षांपुढील लसीकरण सुरू झाल्यानंतर पुन्हा गर्दी वाढणार आहे. यासाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असून, गर्दी करू नये, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.