इंडस्इंड बँकेला 35 लाखांचा गंडा, मार्केटिंग प्रतिनिधीविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 02:06 PM2017-12-31T14:06:15+5:302017-12-31T14:07:00+5:30
सांगली : इंडस्इंड बँकेच्या सांगली शाखेला बँकेतील मार्केटिंग प्रतिनिधी मनोज कुमार पाटील (वय ३३, रा. टाकळी, ता. मिरज) याने ३५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.
सांगली : इंडस्इंड बँकेच्या सांगली शाखेला बँकेतील मार्केटिंग प्रतिनिधी मनोज कुमार पाटील (वय ३३, रा. टाकळी, ता. मिरज) याने ३५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. बँकेच्या कर्जदारांच्या कर्जाची रक्कम परस्पर वसुली करून त्यावर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मनोज पाटील याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज पाटील हा बँकेत मार्केटिंग प्रतिनिधी व वसुलीचे काम करतो. बँकेने जिल्ह्यात शेतक-यांसह व्यापा-यांना मोठ्या प्रमाणात कर्जाचा पुरवठा केला आहे. वसुलीचे काम पाटीलकडे होते. जून २०१६ ते १२ डिसेंबर २०१७ या कालावधित त्याने कर्जदारांकडून कर्जाची वसुली केली. त्यांना कर्ज फेडल्याबाबत बँकेचे लेटरपॅडवर लिहून दिले. त्यावर बँकेचा शिक्काही मारला. मिरजेतील अरीफ मुजावर यांचे दोन लाख ३४ हजार ४५० रुपये, मालगाव (ता. मिरज) येथील अनिल वसंत बेडगे व विजय वसंत बेडगे यांचे अनुक्रमे चार व दोन लाख यासह अन्य पंधरा ते सोळा कर्जदारांची त्याने वसुली केली. पण वसुलीची रक्कम त्याने प्रत्यक्षात बँकेत भरलीच नाही. कर्जदारांना कर्ज फेडल्याचा दाखला मिळाल्याने त्यांनी बँककडे कोणतीही चौकशी केली नाही.
डिसेंबर २०१७ अखेर वसुलीचे टार्गेट असल्याने बँक प्रशासनाने कर्जदाराकडे वसुलीसाठी तगादा लावला. त्यावेळी अनेक कर्जदारांनी मनोज पाटील याच्याकडे कर्ज भरल्याचे सांगितले. तसेच त्याने कर्ज फेडल्याचा दाखलाही दिल्याचे सांगितले. बँकेने दाखले ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी पाटीलने बँकेचे बनावट लेटर पॅड व बनावट शिक्के तयार करुन कर्ज फेडल्याचे दाखल दिल्याचे निष्पन्न झाले.
बँकेने पाटीलकडे पैसे भरण्यास तगादा लावला. पण तो टाळाटाळ करुन लागला. त्यामुळे बँकेचे विभागीय व्यवस्थापक गिरीष पांडुरंग कुलकर्णी (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी शनिवारी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
चौकशीचे काम सुरू
मनोज पाटील याने सध्या तरी कर्जदारांकडून ३० ते ३५ लाखांची रक्कम हडप केल्याचे उघडकीस आले आहे. बँक प्रशासनाने यासंदर्भात चौकशी सुरु ठेवली आहे. कदाचित हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसही चौकशी करुन माहिती घेत आहेत.