औद्योगिक कामगार सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Published: November 2, 2014 12:36 AM2014-11-02T00:36:25+5:302014-11-02T00:40:08+5:30
जिल्ह्यात पाच अपघात : कारखानदारांकडून नियमांना फाटा देण्यावर भर, समस्येचाच धूर अधिक
अंजर अथणीकर ल्ल सांगली
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर परिसरातील औद्योगिक वसाहतीत वीस हजारहून अधिक कामगार काम करीत असताना सुरक्षेचे नियम मात्र धाब्यावर बसवले जात आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरात पाच मोठे अपघात झाले असून, यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ९५०, तर सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरात सातशे लहान, मोठे कारखाने आहेत. सांगली, मिरज व कुपवाड परिसरातील चार औद्योगिक वसाहतींमध्ये वीस हजारहून अधिक कामगार काम करीत आहेत. दहाहून अधिक कामगार असल्यास त्याठिकाणी स्वच्छतागृहाची, कँटीन व विश्रामगृहाची सोय असणे बंधनकारक असताना या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. कारखाना कायद्यानुसार कारखान्यात काम करणाऱ्यांना सुरक्षा बेल्ट, हेल्मेट, हातमोजे, पायमोजे, बूट देणे बंधनकारक असताना ८० टक्क्यांहून अधिक कारखान्यांमध्ये ते पुरवले जात नाहीत. यामुळे गेल्या वर्षभरात पाच मोठे अपघात झाले असून, यामध्ये दोन कामगारांचा मृत्यूही झाला आहे.
कामगारांना सुविधांबरोबरच न्याय हक्कापासूनही वंचित ठेवण्यात येत आहे. दहाच्यावर कामगार असतील तर, त्यासाठी नियम लागू होतील म्हणून नेहमी दहाच्या खालीच कामगार संख्या दाखवण्यात येत आहे. कामगारांचे रजिस्टर ठेवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीमधील ७५ टक्के कारखाने कामगारांचा ईएसआय, प्रॉव्हिडंड फंड भरत नाहीत. यामुळे त्यांना अपघाती विम्याचा लाभ मिळत नाही. ईएसआयची रक्कम न भरल्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून, ते औषधोपचारापासून वंचित रहात आहेत.
अपघातानंतरही मालकावर फौजदारी होताना दिसत नाही. नेहमी वेगवेगळी कारणे सांगून कामगारांना मदतीपासून डावलण्यात येत आहे.