इंदुताई पाटणकर यांचे कार्य युवा पिढीला आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:35 PM2019-07-14T23:35:21+5:302019-07-14T23:35:26+5:30
कासेगाव : क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर यांचे कार्य युवा पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरीब, अनाथ, परित्यक्ता महिलांसाठी केलेले काम ...
कासेगाव : क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर यांचे कार्य युवा पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरीब, अनाथ, परित्यक्ता महिलांसाठी केलेले काम अतुलनीय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी केले.
कासेगाव (ता. वाळवा) येथे क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वाहरू सोनावणे, ठगीबाई वसावे, डॉ. भारत पाटणकर व डॉ. गेल आॅम्वेट यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाबा आढाव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या कार्यकाळाचा विचार करता, इंदुताई पाटणकर यांचे सामाजिक चळवळीत मोठे योगदान आहे. त्यांनी महिलांच्या हक्कासाठी व न्यायासाठी अनेक आंदोलने केली. त्यांचे सुपुत्र डॉ. भारत पाटणकर हे तार्इंचे अपुरे कार्य मोठ्या हिमतीने पुढे नेत आहेत.
यावेळी यावर्षीचा ‘क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर स्मृती पुरस्कार’ नंदुरबार येथील स्त्री-मुक्ती चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या ठगीबाई वसावे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी इंदुताई यांच्यावर लिहिलेल्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, हा चरित्रग्रंथ मी लिहिला नसून, माझ्या आईनेच ते तिच्या डायरीमध्ये वेळोवेळी लिहून ठेवले होते. ते मी या पुस्तकातून फक्त मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ठगीबाई वसावे म्हणाल्या की, हा पुरस्कार मिळणे म्हणजे मोठी जबाबदारी असून, येथून पुढेही मी सामाजिक कामात अग्रेसर राहीन.
यावेळी अॅड. बी. डी. पाटील, रवींद्र बर्डे, शंकरराव भोसले, सचिन पाटील, अॅड. संदीप पाटील, अधिक मिसाळ, क्रांतिकुमार मिसाळ, विजय भिंगारदेवे आदी उपस्थित होते.
जयंत निकम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. योगेश पाठसुते यांनी सूत्रसंचालन केले.