निकृष्ट फळ, जेवणात आळ्या; सांगलीतील आंबेडकर वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांकडून अन्नत्याग
By अशोक डोंबाळे | Published: October 14, 2023 06:47 PM2023-10-14T18:47:13+5:302023-10-14T18:47:51+5:30
निकृष्ट जेवणासह ठेकेदार बदलण्याची मागणी
सांगली : येथील विश्रामबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. ठेकेदार शासनाच्या नियमानुसार जेवण देत नाहीत. जेवणात आळ्या ही सापडत असूनही त्याकडे समाजकल्याणचे अधिकारीही लक्ष देत नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शनिवारी अन्नत्याग आंदोलन केले. दरम्यान, समाजकल्याणचे सहायक आयुक्तांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सांगलीतील विश्रामबाग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह असून या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार वसतिगृहाची ७५ विद्यार्थ्यांची क्षमता आहे. सध्या वसतिगृहात ६० ते ७० विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना फळांचा निकृष्ट पुरवठा होत आहे. जेवणात आळ्या सापडत आहेत. ६० ते ७० विद्यार्थ्यांसाठी अडीच लीटर दुधाचा ठेकेदारांकडून पुरवठा होत आहे. या दुधात पाणीच जास्त असते. या समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करुन ही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे ठेकेदार दिवसेंदिवस निकृष्ट जेवण देत आहे. म्हणून संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करुन दर्जेदार जेवण मिळावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते.
या आंदोलनानंतर लगेच समाजकल्याणचे सहायक आयुक्त चाचरकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन निकृष्ट जेवणाबद्दल संबंधित शक्ती महिला बचत गटावर कारवाई करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसात ठेका रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलन मागे घेऊन विद्यार्थी जेवणाला गेल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या ताटात आळी सापडली. त्यानंतर वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यास विद्यार्थ्यांनी जेवणातील आळ्या दाखवत कसे जेवण करायचे तुम्हीच सांगा, असा सवाल केला. यावर संबंधित कर्मचारी गप्प बसले, त्यांनी एकही शब्द काढला नाही.
दहा दिवसात ठेकेदारांवर कारवाई : जयंत चाचरकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील मुलांना दर्जेदार जेवण मिळत नाहीत. याबद्दल विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना भेटून संबंधित ठेकेदारावर दहा दिवसात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे, अशी प्रतिक्रिया समाजकल्याणचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली.
मुलांना दर्जेदार जेवणाचा पुरवठा : संगीता पाखरे
बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील मुलांना दर्जेदार जेवण देत आहे. फळे, अंडी, भाजीपाला रोज खरेदी करुन देत आहे. मुले अचानक गैरहजर असल्यानंतर दुधाचे नुकसान होत आहे. तरीही आम्ही प्रशासनाकडे तक्रार केली नाही. काही मुले स्वयंपाक करणाऱ्या महिलांना उद्धट बोलत आहेत. त्याकडेही आम्ही दुर्लक्ष करुन मुलांना चांगले जेवण देत आहे, अशी प्रतिक्रिया शक्ती महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता पाखरे यांनी दिली.