गुढेत रस्ते, गटारींचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:33 AM2021-06-09T04:33:32+5:302021-06-09T04:33:32+5:30
कोकरूड : गुढे (ता. शिराळा) येथील पशुवैद्यकीय केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे, गटारीचे काम निकृष्ट झाले असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई ...
कोकरूड : गुढे (ता. शिराळा) येथील पशुवैद्यकीय केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे, गटारीचे काम निकृष्ट झाले असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाडीक युवा शक्तीचे शिराळा तालुका संघटक विठ्ठल पाटील यांनी केली आहे.
गुढे येथे पशुवैधकीय दवाखान्याची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मुख्य रस्त्यापासून या इमारतीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, दुतर्फा गटार आणि संरक्षण भिंत यासाठी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. गेल्या अडीच महिन्यापासून हे काम सुरू आहे. ठेकेदाराकडून कामाबाबत मनमानी सुरू आहे. महिन्याभराचे काम अडीच महिने झाले तरीही पूर्ण नाही. मान्सूनपूर्व पावसाच्या अगोदर पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र ठेकेदाराने हे काम वेळेत केलेच नाही.
पशुवैद्यकीय दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लाल माती पावसाने वाहून रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातीलच माती व रस्त्यावरील कचरा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत गेल्याने पाणी दूषित बनले आहे. परिणामी नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फोटो ०७ काेकरुड १
ओळ : गुढे (ता. शिराळा) येथील गावास पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी दूषित झाल्याचे दिसून येत आहे.