मालगावात रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:39+5:302021-03-04T04:48:39+5:30
ओळ : मालगाव-खंडेराजुरी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम माजी सरपंच प्रदीप सावंत, उपसरपंच तुषार खांडेकर, मगेश यादव ...
ओळ : मालगाव-खंडेराजुरी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम माजी सरपंच प्रदीप सावंत, उपसरपंच तुषार खांडेकर, मगेश यादव यांच्यासह ग्रामस्थांनी बंद पाडले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मालगाव : मिरज तालुक्यातील मालगाव-खंडेराजुरी या रस्त्याचे निकृष्ट काम ग्रामस्थांनी बंद पाडले. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मिरज पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या शुभांगी सावंत, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही सावंत व खांडेकर यांनी दिला.
मालगाव येथील सातपुते पोल्ट्री फाॅर्म ते आवटी मळ्यापर्यंत साडेतीन किलाेमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी ३ कोटी ३० लाख रूपये मंजूर आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. अधिकाऱ्यांची पाठराखण आणि ठेकेदाराच्या खाबूगिरीमुळे हे निकृष्ट काम वादात सापडले आहे. सुमारे पस्तीस वर्षानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याने रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे अशी ग्रामस्थांची अपेक्षा असताना ठेकेदाराने डांबराचा कमी वापर करून कामाचा फार्स सुरू केल्याचा आरोप हाेत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल न घेता ठेकेदारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेले माजी सरपंच प्रदीप सावंत, उपसरपंच तुषार खांडेकर, मंगेश यादव, यांच्यासह ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शुभांगी सावंत, तुषार खांडेकर यांनी केली.
चौकट
तर आंदोलन करणार : सावंत
मालगाव ते खंडेराजुरी रस्ता कामासाठी शासनाने भरीव निधी दिला आहे. पहिल्या टप्प्यातील तीन कोटी ३० लाखाचे डांबरीकरणाचे काम सुरू असले तरी निकृष्ट दर्जामुळे रस्त्याचे काम अल्पजीवी ठरणार आहे. अधिकारीही याकडे लक्ष देत नसल्याने हे काम बंद पाडले आहे. निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई न केल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा माजी सरपंच प्रदीप सावंत, उपसरपंच तुषार खांडेकर यांनी दिला.