दिघंची-भिवघाट रस्त्याचे आटपाडीत काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:37+5:302021-06-18T04:19:37+5:30
आटपाडी : शहरालगत असणाऱ्या साई मंदिर चौक ते स्वतंत्रपूर पाटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी राजपथ कंपनीने जाणीवपूर्वक गटारी केल्या नाही. ...
आटपाडी : शहरालगत असणाऱ्या साई मंदिर चौक ते स्वतंत्रपूर पाटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी राजपथ कंपनीने जाणीवपूर्वक गटारी केल्या नाही. या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिंघची ते भिवघाट मार्गावर आटपाडी हे तालुक्याचे शहर आहे. या शहरातून राज्य महामार्ग जात असून, त्याचे निकृष्ट दर्जाचे काम हे नुकतेच कमी वेळेत पूर्ण केल्याचा विक्रम राजपथ कंपनीने केला आहे. सदरचे काम करताना त्यांनी आटपाडी शहरातील नागरिकांची घोर फसवणूक केली आहे. आम्ही आटपाडीकर अन्याय मूग गिळून सहन करत आहोत. कारण शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात असताना शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दोन्ही बाजूंनी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी, रस्त्याच्या मधोमध पथदीप, दुभाजक असणे गरजचे होते. यातील एकही सुविधा या ठिकाणी राजपथ कंपनीने दिली नाही, अशी विविध कामाची अपूर्णत: असताना त्याकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिला आहे.