वाळवा तालुक्यातील वारणा खोऱ्याच्या नेत्यांची घुसमट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:54+5:302021-09-25T04:26:54+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वारणा खोऱ्यातील वाळवा तालुक्यात असलेली काही गावे शिराळा मतदारसंघात येतात. त्यामुळे ...
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वारणा खोऱ्यातील वाळवा तालुक्यात असलेली काही गावे शिराळा मतदारसंघात येतात. त्यामुळे येथील नेत्यांना राजकीय क्षेत्रात संधी मिळविण्यासाठी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातील नेत्यांची मनधरणी करावी लागते. येथील काही नेते वारणा साखर कारखान्यासह इतर संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत, तरीही या परिसरातील नेत्यांची राजकारणात घुसमट होत आहे.
कुरळपचे ज्येष्ठ नेते पी. आर. पाटील यांनी राजारामबापू पाटील व जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून दीर्घकाळ या परिसरात राजकारण केले. राजारामबापू कारखान्याच्या स्थापनेपासून ते संचालक आणि आता अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. आगामी काळात त्यांना राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्षपद देण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे, पण अद्याप ते मिळालेले नाही. त्यांचे पुत्र संजीव पाटील जिल्हा परिषद सदस्य आहेत.
या परिसरातील ऐतवडे खुर्दलाही राजकीय वारसा आहे. दिवंगत बाजीराव बाळाजी पाटील यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांनी या भागात क्रांती केली आहे. चाळीस वर्षे जिल्हा बँकेवर संचालक असलेल्या बाजीराव पाटील यांनी ११ वर्षे अध्यक्षपदही भूषविले. वाळवा तालुक्यात अशी कामगिरी करणारे ते एकमेव नेते होते. आता डॉ. प्रताप पाटील वडिलांचा वारसा सांभाळत आहेत. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून या परिसरात शैक्षणिक आणि सहकारी क्षेत्रात ते कार्यरत आहेत. परंतु राज्य पातळीसह जिल्हा पातळीवर पदे देताना त्यांचा विचार केला जात नसल्याची खदखद त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे.
चिकुर्डे येथील अभिजित पाटील यांच्याबाबतही तेच घडत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी पाटील यांचा कधीच विचार केला नाही. या परिसरात राजकीय ताकद अबाधित ठेवून ते शिवसेनेत गेले. तेथे त्यांनी ठसा उमटवला नसला, तरी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताकदीवर जिल्हा परिषद लढविण्याची त्यांची तयारी दिसते. पक्षपातळीवर काम करताना त्यांची नेहमीच घुसमट होते. यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी वारणा उद्योग समूहाकडे लक्ष केंद्रित केले आहे.