महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका, गुऱ्हाळांच्या चिमण्या थंडच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 05:04 PM2019-11-06T17:04:19+5:302019-11-06T17:05:28+5:30
महापुराने गुऱ्हाळेही मोडकळीस आली आहेत. दिवाळी संपली तरी गळीत हंगामाची चिन्हे नाहीत. सांगलीला गूळ पाठविणारी कर्नाटकातील गुऱ्हाळेही संकटात आहेत. महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका गुऱ्हाळांनाही बसला आहे. त्यामुुळे यंदा गुळाची भाववाढ होण्याची शक्यता आहे.
संतोष भिसे
सांगली : महापुराने गुऱ्हाळेही मोडकळीस आली आहेत. दिवाळी संपली तरी गळीत हंगामाची चिन्हे नाहीत. सांगलीला गूळ पाठविणारी कर्नाटकातील गुऱ्हाळेही संकटात आहेत. महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका गुऱ्हाळांनाही बसला आहे. त्यामुुळे यंदा गुळाची भाववाढ होण्याची शक्यता आहे.
सांगलीत कर्नाटकातील रायबाग, अथणी, चिक्कोडी, सौंदत्ती, जमखंडी, हारुगेरी, महालिंगपूर, हिडकल येथून गूळ येतो. यंदा महापुराने तेथील गुऱ्हाळघरे पाण्याखाली गेली, ऊसही बुडाला होता. शिराळा तालुक्यातही अशीच स्थिती होती. तेथील हंगाम तुळशी पौर्र्णिमेनंतर सुरु होतो.
यंदा तो सुरू होण्याची चिन्हे अजूनही नाहीत. पुराने गुऱ्हाळघरांची प्रचंड पडझड झाली. कर्नाटकात हजारो एकर ऊस पाण्याखाली गेला. गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू असल्याने गळीत सुरु झाले नाही.
रानात चिखल आणि पाणी साचून असल्याने तोडी ठप्प आहेत. या संकटग्रस्त स्थितीत गळीत कसे सुरु करायचे, हा प्रश्न गुऱ्हाळमालकांपुढे आहे. जुलैपासून सांगली बाजार समितीत गुळाची आवक घटली आहे, त्यामुळे दर देखील तेजीत आहेत.