शिरसीच्या खुनाची माहिती देणार्यास बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:32 PM2017-11-19T23:32:10+5:302017-11-19T23:33:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिरसी (ता. शिराळा) येथील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाºयात शनिवार दि. १८ रोजी अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, ‘नरबळी’तूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
रविवारीही या मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. तसेच हल्लेखोरांबाबतही धागेदोरे मिळाले नाहीत. रविवारी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. रात्री उशिरा विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात ‘अज्ञात व्यक्तीकडून अज्ञात व्यक्तीचा खून’ अशी नोंद करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाºयात मूर्तीजवळ लिंबूला टाचण्या खोवल्या होत्या, तसेच गुलाल, हळद-कुंकू ठेवले होते. मृत व्यक्तीजवळील प्लॅस्टिक पिशवीतही याच वस्तू होत्या. मृत व्यक्तीच्या अंगावर नवीन कपडे होते. त्याच्या डोक्यावर मागील बाजूस जवळच पडलेल्या दगड, विटांनी हल्ला केल्याचे दिसून येत आहे. त्याच्या खिशात पाचवा मैल ते अंकलखोप या बस प्रवासाचे तिकीट मिळाले आहे. मंदिर परिसरातील स्थिती पाहता, हा नरबळीचा प्रकार असावा, अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे.
त्यामुळे रविवारी जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख बोराटे, उपविभागीय पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, प्रवीण जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय महिंद, निवृत्त पोलिस अधिकारी बापूराव जाधव, सरपंच रुपाली भोसले, शेखर भोसले, तसेच मंदिराचे काम करणाºया कामगारांकडे चौकशी करून माहिती घेतली. सायंकाळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मृत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या एसटी बस तिकिटाच्या पुराव्यावरून तीन ते चार ठिकाणी पोलिस पथके तपासासाठी पाठविण्यात आली आहेत.
चक्र भैरवनाथ मंदिरात बळी देण्याची कोणतीही प्रथा नाही. फक्त गोडा नैवेद्य दाखविला जातो. असे असताना मंदिरात संशयास्पद मृतदेह मिळून आला. या नरबळीच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तपासासाठी सहकार्याचे आवाहन
तुम्ही निवृत्त पोलिस अधिकारी आहात. येथील युवकांना हाताशी धरून पोलिस तपासात मदत करा. खुन्याचा शोध लावल्यास तुम्हाला योग्य बक्षीस देऊ, असे आवाहन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी निवृत्त पोलिस अधिकारी बापूराव जाधव यांना केले. रविवारी अधिकाºयांनी या पूर्ण परिसराची तपासणी केली. पोलिस वाहनांचा ताफा पाहून नागरिकांनीही गर्दी केली होती.