Sangli- दंडोबाच्या निरीक्षण मनोऱ्यावरील शीलालेखावर नव्याने प्रकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 06:37 PM2023-07-05T18:37:26+5:302023-07-05T18:37:41+5:30
सांगली : दंडोबा डोंगरावरील निरीक्षण मनोऱ्याच्या दगडी बांधकामातील शिलालेखाची माहिती नव्याने उजेडात आणण्याचा प्रयत्न इतिहास अभ्यासकांनी केला आहे. या ...
सांगली : दंडोबा डोंगरावरील निरीक्षण मनोऱ्याच्या दगडी बांधकामातील शिलालेखाची माहिती नव्याने उजेडात आणण्याचा प्रयत्न इतिहास अभ्यासकांनी केला आहे. या शिलालेखामध्ये दाम्पत्याचे शिल्प व त्याशेजारी काही मजकूर कोरला आहे.
कवठेमहांकाळ येथील इतिहास अभ्यासक पवनपुत्र जकाते यांनी शिलालेखाविषयी माहिती दिली. शिल्प व शिलालेख उंचावर असल्याने सहसा कोणाच्या दृष्टीस पडत नाही. इतिहासाचे अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी मजकुराचे वाचन केले. ‘श्री दंडनाथ चरणी नागोजी राम देशपांडे प्रा| (प्रांत) मिरज’ असा मजकूर आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी नागोजी राम यांना मिरज परगण्याचे देशपांडे पण दिल्याचे पत्र आहे. शाहू दप्तरातील वर्णनात्मक सूची खंड २ मध्ये ते उपलब्ध आहे. शाहू महाराजांच्या काळात नागोजी राम ही महत्त्वपूर्ण व्यक्ती होती. पूर्वी परगण्याच्या जमाबंदीचे दप्तर सांभाळण्याचे काम देशपांडे करायचे. उत्पन्नातील ठराविक महसूल त्यांना मिळत असे.
दंडोबा डोंगरावर नागोजी राम देशपांडे या व्यक्तीने हा निरीक्षण मनोरा बांधला असावा किंवा त्यांच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली असावी, असा कयास आहे. नागोजी राम यांची ही समाधी आहे? की त्यांच्या आठवणीत बांधलेली दीपमाळ आहे याविषयीदेखील मतमतांतरे आहेत. हा शिलालेख व वास्तू सुमारे पावणेतीनशे वर्ष जुनी असावी असे जकाते म्हणाले. संशोधनकामी त्यांना दुर्ग अभ्यासक प्रवीण भोसले व इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर यांनी सहकार्य केले.