तरुणाला पोलीस कोठडीत अमानुष मारहाण प्रकरण : मंडलिक, पांढरे यांच्यासह पाच जणांना सशर्त जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 02:15 PM2022-01-06T14:15:36+5:302022-01-06T14:16:14+5:30
जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींमध्ये संशयितांना फिर्यादीच्या गावात प्रवेश करायला बंदी घालण्यात आली आहे. गावात प्रवेश न करण्यासह फिर्यादीला कोणताही संपर्क अथवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये असेही आदेशात म्हटले आहे.
सांगली : दोन दशकांपूर्वी विटा येथील विजय पाटील या तरुणाला पोलीस कोठडीत अमानुष मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, उपअधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. मंडलिक, पांढरे यांच्यासह सुरेश कृष्णराव पवार, जगन्नाथ आत्माराम पवार, राजेंद्र मारुती माळी आदींचा यात समावेश आहे.
विजय पाटील मारहाण प्रकरणी पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर मंडलिक, पांढरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्पुरता जामीन मिळाला होता तर, अटकपूर्व जामिनावर मंगळवारी निर्णय अपेक्षित होता. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश सातवळेकर यांनी निकाल राखून ठेवला होता. बुधवारी यावर निकाल देताना सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, त्याचवेळी अटींचेही पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींमध्ये संशयितांना फिर्यादीच्या गावात प्रवेश करायला बंदी घालण्यात आली आहे. गावात प्रवेश न करण्यासह फिर्यादीला कोणताही संपर्क अथवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये असेही आदेशात म्हटले आहे. याशिवाय या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असताना, आवश्यकता असेल तेव्हा तपासासाठी बोलावल्यावर हजर राहून सहकार्य करण्याच्या अटींवर हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काय होते प्रकरण...
विजय पाटील यांचे भाऊ बाळासाहेब यांचा १९९० मध्ये खून झाला होता. या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. विजय पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक रामचंद्र घुगे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्याचा राग मनात धरून विजय पाटील यांना पोलिसांनी विविध गुन्ह्यात अडकविले. पोलीस कोठडीत त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या सर्व गुन्ह्यांतून पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
पाटील यांनी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय यशवंत मंडलिक (सध्या सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक), उपअधीक्षक विश्वास दत्तू पांढरे (सध्या सहायक पोलीस आयुक्त, मुंबई), सुरेश पवार (सध्या सेवानिवृत्त), जगन्नाथ पवार (सध्या उपनिरीक्षक, सांगली), वाहनचालक राजेंद्र माळी यांच्याविरोधात कारवाईसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.