कोरोना रुग्णांसाठी तब्बल सव्वा लाखाचे इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:28+5:302021-07-14T04:30:28+5:30
सांगली : कोरोनाबाधितांसाठी आता कॉकटेल इंजेक्शनचा वापर सुरू झाला आहे. तब्बल १ लाख २० हजार रुपये किमतीचे हे इंजेक्शन ...
सांगली : कोरोनाबाधितांसाठी आता कॉकटेल इंजेक्शनचा वापर सुरू झाला आहे. तब्बल १ लाख २० हजार रुपये किमतीचे हे इंजेक्शन यापूर्वी अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आले होते. सांगली जिल्ह्यात आजवर बारा रुग्णांसाठी वापर झाला आहे.
कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन अैाषधांचे इंजेक्शन कॉकटेल स्वरूपात देण्यात येते. त्याचे परिणाम अत्यंत चांगले असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. एका पॅकमध्ये दोन्ही अैाषधांच्या दोन कुप्या असतात. प्रत्येक कुपीत प्रत्येकी १२० मिली औषध असते. एका रुग्णाला दोन्हींचे मिळून १२० मिलींचे मिश्रण इंजेक्शनद्वारे टोचले जाते. त्यामुळे एका पॅकमधून दोन रुग्णांना इंजेक्शन मिळते. या पॅकची किंमत सर्व करांसह १ लाख २० हजार रुपयांपर्यंत जाते.
मुंबईत याचा सर्रास वापर सुरू झाला असून सांगलीतही बारा रुग्णांना आजपावेतो दिले आहे. मिरज, तासगाव आणि इस्लामपुरातील खासगी कोविड रुग्णालयांत वापर झाला आहे. या इंजेक्शनमधून कोरोना प्रतिबंधक प्रतिजैविके रुग्णाच्या शरीरात सोडली जातात, त्यामुळे रुग्ण वेगाने बरा होतो. मृत्यूदर झपाट्याने कमी होऊन रुग्णालयात राहण्याचा कालावधी पाच ते सहा दिवसांपर्यंत खाली येतो. या इंजेक्शनची परिणामकारकता रेमडेसिविरपेक्षाही जास्त आढळली आहे.
चौकट
महाग असल्याने वापर नाही
जिल्ह्यात काही मोजक्या वितरकांकडेच ते उपलब्ध आहे. किंमत खूपच जास्त असल्याने डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांचा त्याच्या वापराकडे कल नाही. शिवाय एका कुपीतून दोघा रुग्णांसाठी ते दिले जाते, त्यामुळे एखादा रुग्ण तयार झाला तरी आणखी एखादा रुग्ण मिळवावा लागतो. या स्थितीत इंजेक्शनचा वापर अद्याप अत्यंत मर्यादित आहे.