जतमध्ये दोघांना बेदम मारहाण
By Admin | Published: December 2, 2014 10:22 PM2014-12-02T22:22:41+5:302014-12-02T23:29:15+5:30
शस्त्राने हल्ला : अज्ञात टोळीविरुद्ध गुन्हा दाखल
जत : पवनऊर्जा कंपनीकडे सुरक्षारक्षक व सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या दोघांवर अज्ञात पंधरा ते वीस जणांच्या टोळीने चोरीच्या उद्देशाने धारदार हत्याराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. जखमींवर जत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना सोमवारी रात्री दहा वाजण्याच्यादरम्यान जत ते कोळगिरी डोण भागातून जाणाऱ्या रस्त्यावर जतपासून सुमारे तीन कि.मी. अंतरावर घडली. याप्रकरणी जत पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला आहे. परंतु मंगळवारी रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे येथे उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश निळे (वय ३५, रा. कोळगिरी, ता. जत) हे पवनऊर्जा निर्माण कंपनीकडे सुपरवायझर म्हणून काम करतात. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्यादरम्यान सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे अनिल कोळी (२५), संगाप्पा निळे (३०), बाळ निळे (२०, सर्व रा. कोळगिरी, ता. जत) यांना कामावर सोडण्यासाठी सर्वजण मिळून चारचाकी बोलेरो वाहनातून जात असताना तोंडाला कापड बांधलेल्या पंधरा ते वीसजणांच्या टोळीने त्यांना रस्त्यात अडविले.
यावेळी सुरेश निळे व अनिल कोळी हे वाहनातून खाली उतरले असता त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले आहे, तर गाडीत बसलेले संगाप्पा निळे व बाळू निळे हे दोघे शांत बसले होते. त्यामुळे त्यांना मारहाण झाली नाही. चोरी करण्याच्या उद्देशाने या चोरट्यांचे टोळके आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल आहे. (वार्ताहर)
पोलिसांचा कानाडोळा
या घटनेमुळे जत तालुक्यातील सुरक्षारक्षकांत खळबळ माजली आहे. परंतु हे प्रकरण गंभीर असूनही पोलिसांनी याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे कामकाजाबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.