राजारामबापू कारखान्याच्या जत शाखेडून शेतकऱ्यांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:31+5:302021-07-02T04:18:31+5:30
जत : राजारामबापू साखर कारखान्याच्या डफळे साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला दर देणे आवश्यक आहे. कारखाना प्रशासन एफआरपीप्रमाणे ...
जत : राजारामबापू साखर कारखान्याच्या डफळे साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला दर देणे आवश्यक आहे. कारखाना प्रशासन एफआरपीप्रमाणे दर देण्यास शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. एफआरपीप्रमाणे उसाची बिल दिली नाही तर कारखाना स्थळावर आमरण उपोषण करू, असा इशारा प्रहार संघटनेचे जत तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी दिला आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनीही ऊस दराबाबत कारखाना स्थळावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लेखी निवेदन तहसीलदार यांना दिले आहे. जत तालुका प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
सुनील बागडे म्हणाले, जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास दिला आहे. मात्र शेतकऱ्यांना दराबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बिलाबाबत इस्लामपूरला जाऊन विचारा, अशी अधिकारी उत्तरे देत आहेत. ही गंभीर बाब आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. साखर कारखान्याकडून कमी दराने बिले काढून शेतकऱ्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असेल तर जत तालुका प्रहार संघटना शांत बसणार नाही. तरी आठ दिवसांच्या आत योग्य दराने ऊस बिले शेतकऱ्यांना अदा न केल्यास प्रहार संघटनेतर्फे अमरण उपोषण करण्याचा करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.