इस्लामपूरच्या नेत्यासह पत्रकाराकडे चौकशी : कोरेगाव-भीमा प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:49 PM2018-03-23T22:49:10+5:302018-03-23T22:49:10+5:30
सांगली : कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुरुवारी रात्री इस्लामपुरातील एका राजकीय नेत्यासह एका पत्रकाराकडे चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवून
सांगली : कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुरुवारी रात्री इस्लामपुरातील एका राजकीय नेत्यासह एका पत्रकाराकडे चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवून घेतले. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मातोश्रींच्या रक्षाविसर्जनाला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडेइस्लामपूरला आले होते का, या अनुषंगाने ही चौकशी झाली.
कोरगाव-भीमा दंगलप्रकरणी भिडे, मिलिंद एकबोटेंसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. एकबोटेंना अटक झाली आहे. भिंडे यांच्या अटकेसाठी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर २७ मार्चला मुंबईत मोर्चा काढणार आहेत, तर भिडे यांनीही आंबेडकर यांच्या अटकेसाठी २८ मार्चला राज्यभर मोर्चे काढण्याचा इशारा दिला आहे. भिडे यांनी चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन, हे प्रकरण होऊन अडीच महिने झाले तरी शासनाने चौकशी करुन मी दोषी आहे का नाही, याबद्दलचे निवेदन केले नसल्याचा आरोप चार दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे दहा जणांचे पथक गुरुवारी सांगलीत भिडे यांच्या चौकशीसाठी आले होते. पण भिडे मोर्चाच्या नियोजनासाठी शिराळ्याला गेल्याने त्यांची चौकशी झाली नाही. पण शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांची दोन तास चौकशी झाली.
चौगुले यांनी चौकशीत घटनेवेळी भिडे इस्लामपूर येथे माजी मंत्री जयंती पाटील यांच्या मातोश्रींच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमास गेले होते, तसेच ते तिथे दिवसभर होते, असे सांगून पुरावेही दिले. त्यामुळे रात्री उशिरा पथक जाताना इस्लापुरात थांबले. तिथे एका राजकीय नेत्यासह एका पत्रकाराची चौकशी केली. रक्षाविसर्जन कार्यक्रमास भिडे आले होते का, याअनुषंगाने चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवून घेतले.