भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांची चौकशी होणार - :महापालिका महासभेत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:59 PM2019-06-14T22:59:36+5:302019-06-14T23:01:37+5:30
महापालिकेने भाडेतत्त्वावर शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना, क्रीडा मंडळे, रुग्णालयांना दिलेल्या जागांची चौकशी करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. यासंदर्भात २० जूननंतर विशेष सभा घेण्याची तयारीही महापौर संगीता खोत यांनी दर्शविली
सांगली : महापालिकेने भाडेतत्त्वावर शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना, क्रीडा मंडळे, रुग्णालयांना दिलेल्या जागांची चौकशी करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. यासंदर्भात २० जूननंतर विशेष सभा घेण्याची तयारीही महापौर संगीता खोत यांनी दर्शविली. या सभेत माळबंगला येथील जागा खरेदीसह सिध्दिविनायक कॅन्सर हॉस्पिटलला दिलेल्या जागेबाबत चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यांनी शुक्रवारी महापालिकेची सभा झाली. सभेत नगरसेविका वहिदा नायकवडी यांनी मिरजेतील सिध्दिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात उपचार मिळावेत, अशी मागणी केली. जगन्नाथ ठोकळे यांनी सिध्दिविनायक हॉस्पिटलचा ६६ लाखाचा कर थकीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. रुग्णालयाला भाड्याने दिलेल्या जागेची तीस वर्षांची मुदत चार महिन्यांनी संपत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नर्गिस सय्यद यांनी, कोणत्याही चॅरिटेबल संस्थेच्या रुग्णालयात गरिबांसाठी दहा टक्के राखीव कोट्यातून मोफत उपचार करणे बंधनकारक करावे, अशी मागणी केली. संतोष पाटील यांनी, सिध्दिविनायक हॉस्पिटलच्या थकीत कराबाबत न्यायालयाने स्थगिती दिल्याचे सांगितले. आनंद देवमाने यांनी, हॉस्पिटलकडून भाडे वसुलीची मागणी केली. महापालिकेने नाममात्र भाड्याने दिलेल्या अनेक भूखंडांवर रुग्णालये, शैक्षणिक संस्था उभ्या आहेत. त्यांच्याकडून जागेचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले.
संतोष पाटील यांनी, माळ बंगला येथील जागा खरेदीचा विषय उपस्थित केला. याप्रकरणी यापूर्वीच चौकशीचे आदेश दिले आहेत, मात्र तत्कालीन उपायुक्तांची बदली झाल्याने नवीन चौकशी समिती नियुक्तीची मागणी केली.
विजय घाडगे यांनी, कोणत्याही एका संस्थेचा निर्णय न घेता ज्या ज्या लोकांनी भूखंड घेतले आहेत त्या सर्वांवरच कारवाईची मागणी केली. यावरून सभेत गोंधळ निर्माण झाला. सभागृह नेते युवराज बावडेकर यांनी, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळांना दिलेल्या भूखंडांची एकत्रित माहिती मागवून त्यावर निर्णय घेण्यासाठी विशेष महासभा घ्यावी अशी सूचना केली. ही सूचना मान्य करीत महापौर खोत यांनी, माळबंगला, सिध्दिविनायक हॉस्पिटलच्या जागेसह अन्य जागांबाबत उपायुक्तांनी चौकशी करून अहवाल द्यावा, त्यावर २० जूननंतर विशेष सभा घेण्याची ग्वाही दिली.
संजयनगरमधील भूखंड : हडप नाही
संजयनगरमधील एक भूखंड पदाधिकारी, नगरसेवकांनी हडप केल्याचा आरोप नुकताच झाला होता. त्यावरही सभागृहात चर्चा झाली. पण या जागेवरील सभागृहाचे नामकरण करण्याचा व ते भाड्याने देण्याचा विषय अजेंड्यावर होता. महासभेने त्यासंदर्भात अहवाल मागविला आहे, तसा ठरावही केला आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र, भूखंडच हडप केल्याचा आरोप करून जनतेची दिशाभूल चालविली आहे. प्रशासनाने चुकीच्या आरोपांचे खंडण करण्याची गरज होती. पण त्यांनी तसे केले नाही. प्रशासनामुळे नगरसेवक बदनाम होत असल्याचा आरोप संतोष पाटील यांनी केला.
महासभेतील चर्चा...
आरोग्य कर्मचाऱ्यांना वन डे पेमेंट देण्याची मागणी
दिव्यांगांना दाखल्यासाठी विशेष कॅम्पचे नियोजन
दर सुधार समितीने सुचविलेला दरवाढीचा विषय प्रलंबित
महिला सदस्यांसाठी १८ व १९ जूनला व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा
रखडलेल्या खोकी पुनर्वसनाची माहिती सादर करण्याचे आदेश