सार्वजनिकच्या रस्त्यांची त्रयस्थातर्फे चौकशी

By admin | Published: July 19, 2014 11:17 PM2014-07-19T23:17:54+5:302014-07-19T23:23:21+5:30

अधिकाऱ्यांना इशारा : नियोजन समितीचा १७५ कोटींचा आराखडा मंजूर

Inquiries by Public Road Trials | सार्वजनिकच्या रस्त्यांची त्रयस्थातर्फे चौकशी

सार्वजनिकच्या रस्त्यांची त्रयस्थातर्फे चौकशी

Next

सांगली : जिल्ह्यातील विशेषत: मिरज पूर्वभागातील रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब झाला असून, याची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा आज (शनिवार) नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. यावेळी जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा १७५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले.
कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात सभा झाली. यावेळी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील, आ. सदाशिवराव पाटील, आ. मानसिंगराव नाईक, आ. प्रकाश शेंडगे, पालक सचिव एस. एस. संधू, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, महापालिका आयुक्त अजिज कारचे आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, मिरज पूर्वभागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यासाठी अठरा कोटी मंजूर झाले आहेत. झालेल्या रस्त्यांबाबत तक्रारी आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांच्या दर्जाबाबत त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी करण्यात येईल. योजना आराखड्यातून होणाऱ्या सर्वच कामांची वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विशेष पथकामार्फत तपासणी करण्याचे नियोजन आहे. रस्त्याच्या कामाची सर्व माहिती वेबसाईटवर टाकली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा योग्य पध्दतीने खर्च होणे बंधनकारक आहे. कामांच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड सहन केली जाणार नाही. याची दखल घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
तुम्ही सांगाल तो उमेदवार भाजप देईल!
नियोजन समितीमध्ये भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे बोलण्यासाठी उभे राहिले असता, पतंगराव त्यांना म्हणाले की, यावेळी जतमधून भाजपकडून तुम्ही उभे राहणार का विलासराव जगताप?, यावर शेंडगे यांनी आधी टंचाईवर बोलूया, असे सांगितले. त्यानंतर पतंगरावांनी हाच प्रश्न जगतापांना विचारला. यानंतर जगताप म्हणाले की, साहेब तुम्ही सांगाल तो उमेदवार भाजप देईल. यावर हशा पिकला.
पाणी योजनातून काही सदस्यांनी मोफत पाणी देण्याची मागणी केली. त्यावर सध्याचे पाणी केवळ पिण्यासाठीच असून, शेतीसाठी नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. फुकटचे पाणी दिल्यास सिंचन योजना बंद पडतील, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Inquiries by Public Road Trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.