सांगली महापालिकेच्या आयुक्तांवरील आक्षेपांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:45 PM2018-06-01T23:45:39+5:302018-06-01T23:45:39+5:30
सांगली : महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर हे भाजपधार्जिणे असून, त्यांच्या अधिपत्याखाली निवडणुका झाल्यास पक्षपातीपणा होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार महापौर हारूण शिकलगार यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालानंतर आयोगाकडून आयुक्तांबद्दलचा फैसला घेतला जाणार असल्याचे समजते.
महापौर शिकलगार यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यात महापालिकेच्या आयुक्तांनी निवडणूक आयोगाचा १९६९ चा आदेश दाखवून निवडणुकीच्या पूर्वीच तीन महिने अगोदरच विकासकामे प्रलंबित ठेवण्याचे आदेश मनपाच्या खातेप्रमुखांना दिले आहेत. मात्र, हे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहीत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात नगरसेवकांची कामे ठप्प झाली आहेत. तसेच मंत्री, राज्यमंत्री, आमदार व खासदारांना काम करण्यास मुभा मिळत आहे. हा आयुक्तांनी पक्षपातीपणा केला आहे. पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्हाभर लागू होती. त्यानुसार महापालिकेच्या पदाधिकाºयांची वाहने व सीमकार्ड प्रशासनाने काढून घेतली. फलक देखील काढले. निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा झाली, तरीदेखील पदाधिकाºयांना वाहने दिली नाहीत. राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सांगलीत येणार असल्याचे कळताच आयुक्तांनी पदाधिकाºयांना घाईगडबडीने रात्रीत वाहने परत केली. तसेच कार्यालयावर फलक लावले. त्यांचा हा ढोंगीपणा आहे. त्यांनी अधिकाºयांना व्हॉट्स अॅपवरून पाठविलेल्या संदेशांची सत्यता पडताळावी. आयुक्तांनी अनेक कामे अधिकाराचा गैरवापर करून केली आहेत. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे या निवडणुका आयुक्तांच्या अधिपत्याखाली घेऊ नयेत, अशी मागणी केली होती.
महापौरांच्या या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. आयोगाने जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांना, याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी महापौरांसह काही अधिकाºयांची भेट घेऊन आयुक्तांबद्दलच्या आक्षेपांची माहिती घेतल्याचे समजते. आयुक्तांबद्दलचा अहवाल जिल्हाधिकाºयांनी तयार केला असून लवकरच तो आयोगाकडे पाठविला जाणार आहे. या अहवालानंतर निवडणुका आयुक्तांच्या अधिपत्याखाली घ्यायच्या की नाही, याचा फैसला होणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या अहवालाकडे सत्ताधारी काँग्रेसचे लक्ष लागले आहे.
चौकशीची कबुली
जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार माझ्याविरोधातील आक्षेपांबाबत माहिती घेतली आहे. त्यांना खुलासेवार माहिती दिली असल्याचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सांगितले. तसेच महापौर शिकलगार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही चौकशीला दुजोरा दिला. आयुक्तांबद्दलच्या आक्षेपांबाबत अधिकाºयांनी माझ्याकडे चौकशी केली. त्यांना त्यांच्या कारभाराबद्दलची सर्व माहिती दिली आहे. ते पक्षपातीपणे वागतात, यावर मी आजही ठाम आहे. आता जिल्हाधिकाºयांकडून काय अहवाल जातो, याकडे आमचे लक्ष आहे.