मिरजेत ‘जलयुक्त’च्या कामात घोटाळा-प्रांताधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:50 AM2018-03-27T01:50:45+5:302018-03-27T01:50:45+5:30
मिरज : जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी स्थानिक ठेकेदारांना डावलून तालुक्यातील विजयनगर या एकाच गावातील ठेकेदारांना कामे देणे, मंजुरी आदेशाअगोदर कामाचा करार करणे हा प्रकार मिरज पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने घडला आहे.
चार गावात सुरू असलेली या योजनेची कामे निकृष्ट असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आल्याने तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश प्रांताधिकाºयांनी दिले आहेत.
मिरज तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत १ कोटी १० लाख रूपये खर्चाची नाला, ओढा रूंदीकरण व खोलीकरणाची १९ कामे मंजूर आहेत. ही कामे मिरज पंचायत समितीचा छोटे पाटबंधारे विभाग राबवित आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामे राबविताना स्थानिक ठेकेदारांना प्राधान्य द्यावयाचे आहे. एकापेक्षा अधिक ठेकेदारांची कामांची मागणी असल्यास कामे विभागून द्यावयाची आहेत. मात्र ठेकेदार नियुक्तीचे अधिकार ग्रामपंचायतीला असताना, अधिकाºयांनी ठेकेदार नेमणुकीचा अधिकार सरपंचांकडून लेखी पत्राने स्वत:कडे घेत कामाची मागणी करूनही स्थानिक ठेकेदारांना डावलून संगनमताने विजयनगर गावातील ठेकेदारांना वेगवेगळ्या नावे ठेका दिल्याचे सतीश निळकंठ यांनी निदर्शनास आणून दिले.
त्यातच प्रशासकीय मंजुरीपूर्वी करारपत्रही करण्याचा धक्कादायक प्रकार बिसूर येथे घडला आहे. बिसूर येथील नाला, ओढा खोलीकरण व रुंदीकरणासाठी १४ लाख रुपये मंजूर आहेत. ही कामे संगनमताने स्थानिकांना डावलून इतर ठेकेदारांना दिली आहेत. बिसूर येथील कामाला १४ मार्चला मंजुरी मिळाली असताना मंजुरीपूर्वीच सतरा दिवस अगोदर २४ फेब्रुवारी रोजी कामाचे करारपत्र केले आहे. या करारपत्रावर सरपंच व ग्रामसेवकांच्या सहीऐवजी केवळ सरपंचाची सही आहे. प्रशासकीय मंजुरीपूर्वी ठेकेदारी देण्यात घोटाळा करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा ठेका देण्यात झालेला घोटाळा व पंचायत समितीच्या चौकशी समितीने पाहणी केलेली कामे निकृष्ट असल्याचे उघडकीस आले असल्याने या कामाच्या घोटाळ्याची चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी निळकंठ यांनी प्रांताधिकारी विकास खरात यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन प्रांताधिकाºयांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या कामाच्या घोटाळ्याचे पडसाद २७ मार्च रोजी मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटण्याची शक्यता आहे. पदाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयास एकजुटीने जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.
चौकशीसाठी समितीची नियुक्ती
जलयुक्त शिवार योजनेच्या कामाच्या पाहणीसाठी सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, सदस्य अनिल आमटवणे, किरण बंडगर, कृष्णदेव कांबळे व गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीने आरग, बेडग, टाकळी व लिंगनूर या गावातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. यात कामांचा फार्स करून निधी लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. चारही गावातील कामे निकृष्ट असल्याचा चौकशी अहवाल समिती सादर करणार आहे.