तासगाव पालिकेतील गैरकारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:05 PM2018-09-06T12:05:38+5:302018-09-06T12:14:16+5:30
तासगाव नगरपालिकेत सत्तेतील गोल्डन गँगकडून अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनेक बोगस कामे झाली आहेत. लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.
तासगाव : तासगाव नगरपालिकेत सत्तेतील गोल्डन गँगकडून अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनेक बोगस कामे झाली आहेत. लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबत ‘लोकमत’मधून ‘कारभाऱ्यांचा विकास, तासगाव भकास’ अशी मालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्याची दखल घेत खासदार संजयकाका पाटील यांनी पालिकेतील गैरकारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यधिकारी गणेश शिंदे यांना दिले आहेत. तसेच भ्रष्ट कारभार करणाऱ्यां अधिकारी आणि कारभाऱ्यांना पाठीशी घालणार नसल्याचे खासदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.
तासगाव पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी काही महिन्यांपासून बोगस ठराव करून, लाखो रूपयांचा निधी हडप करण्याचे कारनामे सुरु केले आहेत. याबाबत ‘लोकमत’मधून सत्ताधाऱ्यांच्या बेलगाम कारभाराबाबत विशेष मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. या मालिकेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेला भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला होता.
या मालिकेची दखल घेत खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पाटील म्हणाले, जनतेने मोठ्या विश्वासाने पालिकेची सत्ता भाजपकडे दिली आहे. जनतेच्या विश्वासाशी बांधील राहत, शहराच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
हा निधी आणण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च झाला पाहिजे. या निधीवर अन्य कोणी डल्ला मारत असेल, तर ते अजिबात सहन केले जाणार नाही. पालिकेच्या कारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना दिले आहेत. काही नगरसेवकांकडून माझ्या नावाचा वापर करून बेकायदा काम करण्याचे उद्योग सुरू आहेत. हे अजिबात सहन करणार नाही.
माझ्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना लवकरच त्यांची जागा दाखवून देऊ. चौकशीत कोणीही दोषी आढळला तरी, कोणालाही पाठीशी घालणार नाही. काही अधिकाऱ्यांकडून जाता-जाता हात मारण्याचे उद्योग झाले आहेत. त्याचीही सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई होईल, असेही खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.
स्वच्छतेचा ठेका बोगस असेल तर रद्
शहर स्वच्छतेचा ठेका बोगस कागदपत्रे जोडून घेण्यात आला आहे. गोल्डन गँगकडून नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारी असूनदेखील ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे. याबाबत संजयकाका म्हणाले, ठेक्याबाबतच्या काही तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. माझ्या नावाचा गैरवापर करून कोणी ठेकेदाराला अभय देत असेल, तर गय केली जाणार नाही. बोगसगिरी असेल तर ठेका रद्द होईल, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.