कवलापुरात आढळला बहामनी काळातील शिलालेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:11+5:302021-05-26T04:28:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात सन १४९१ मधील शिलालेख आढळला. भिवाजी नामक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात सन १४९१ मधील शिलालेख आढळला. भिवाजी नामक व्यक्तीने मंदिर बांधल्याचा उल्लेख त्यावर आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी शिलालेखाचे संशोधन केले.
यामुळे जिल्ह्याच्या बहामनी काळातील धार्मिक बाबींवर प्रकाश पडणार आहे. जिल्ह्यात आजवर उपलब्ध झालेला संपूर्ण मराठी भाषेतील कालदृष्ट्या पहिलाच शिलालेख आहे.
मंदिरात प्रदक्षिणा मार्गावर भिंतीमध्ये जमिनीलगत हा शिलालेख आहे. गावातील पाच ऐतिहासिक शिलालेखांचा अभ्यास कुमठेकर आणि काटकर करत आहेत. यादरम्यान आढळलेल्या शिलालेखात पाच मराठी ओळी आहेत. बहमनीकालीन मराठी भाषेची वैशिष्ट्ये त्यात आढळली. शके १४१३ म्हणजे सन १४९१ च्या चैत्र महिन्यात कोरण्यात आला आहे. प्रारंभी मध्यभागी शिवलिंग असून दोन्ही बाजूंना सूर्य-चंद्र आणि गाईचे चित्र कोरले आहे. शेवटी नमस्कार मुद्रेतील व्यक्तीचे चित्र आहे.
मोडी लिपीतील अक्षरांची काही वळणेही आढळतात. कवलापुरात देवगिरी यादव राजा कृष्णदेवराय याचा सन १२५७ चा संस्कृत-मराठी मिश्रित लेख यापूर्वी आढळला होता. जिल्ह्यात आजवर उपलब्ध झालेल्या शिलालेखांपैकी संपूर्ण मराठीतील हा पहिलाच आहे. बहामनी कालीन मराठी भाषेची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या संशोधनासाठी मंदिराचे विश्वस्त डॉ. विवेक पाटील, दर्शन गुरव, प्रमोद लाड यांनी सहकार्य केले.
चौकट
भिवाजीने देणग्यांमधून मंदिर बांधले
या शिलालेखात 'स्वस्ती श्री शेकू १४१३ वर्षे विरोधिकृतुनाम संवत्सरे चैत सुध द्वादशी गुरुवारू ते दीसी भिवाजी बीन तानजी बहिरवदासु तेणे भिक्षा मागोनु देऊळ बाधळे' असे म्हटले आहे. यामध्ये भिवाजी हा स्वतःला बहिरवदास म्हणजे भैरवाचा दास म्हणवून घेतो. हे मंदिरही काळभैरवाचेच आहे. भिवाजीने भिक्षा मागून म्हणजे देणगी गोळा करून मंदिर बांधले असावे.