शिराळ्याचा तलाठी लाच घेताना जाळ्यात, रंगेहात पकडले : पाच हजार रुपये घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:37 PM2017-12-29T13:37:44+5:302017-12-29T13:39:07+5:30
शिराळा येथील तलाठी सुभाष श्रीपती पाटील (वय ५१, रा. ऐतवडे खु., ता. वाळवा) यास ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून रंगेहात पकडले. याबाबत शिराळा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून संशयित सुभाष पाटील यास अटक केली आहे.
शिराळा : येथील तलाठी सुभाष श्रीपती पाटील (वय ५१, रा. ऐतवडे खु., ता. वाळवा) यास ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून रंगेहात पकडले. याबाबत शिराळा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून संशयित सुभाष पाटील यास अटक केली आहे.
शिराळा येथील तक्रारदाराने जागा खरेदी केली होती. खरेदी क्षेत्राची नोंद सात-बारावर करण्यासाठी तलाठी पाटील याने सहा हजार रुपये लाच मागितली. तडजोड होऊन पाच हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. गुरुवारी सायंकाळी कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना पाटील याला पकडले.
ही कारवाई पोलिस उपायुक्त संदीप दिवाण, पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक पोलिस फौजदार शामसुंदर बुचडे, शरद पोरे, संदीप पालेकर, आबासाहेब गुंडणके, सर्जेराव पाटील यांनी केली.
वर्षात तिसरी कारवाई
१८ एप्रिल २०१७ रोजी तलाठी संजय पाटील व मंडल अधिकारी सुरेश पाटील यांना, तर १८ जुलै २०१७ रोजी मंडल अधिकारी समीर पटेल यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. गुरुवारी तलाठी सुभाष श्रीपती पाटीलला पकडण्यात आले. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवरील वर्षातील ही तिसरी कारवाई झाली. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.