मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही, पण.. - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
By संतोष भिसे | Published: January 5, 2024 03:45 PM2024-01-05T15:45:39+5:302024-01-05T15:46:38+5:30
..त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही राहणार
सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात आंदोलने झाली. मनोज जरांगे पाटीलही सभा घेत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच प्रामाणिक इच्छा असून, त्यादृष्टीने राज्य सरकार पावलेही उचलत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. गरीब मराठा समाजही आरक्षणामुळे मुख्य प्रवाहात येऊ शकतो त्यामुळे या आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
आठवले म्हणाले की, मराठा समाजातील गरीब घटकाला आरक्षण मिळायलाच हवे. ज्यांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा घटकाचा यासाठी विचार व्हावा. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. सरकार त्यावर सध्या कामही करत आहे. हे आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून न घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण दिल्यासही तोडगा मिळू शकतो.
सध्या सुरू असलेला ओबीस-मराठा वादही मिटणे आवश्यक आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातीलही मतभेद मिटवले, तर आरक्षणाच्या मागणीवर सरकारला काम करता येणार आहे. २० जानेवारीपासून जरांगे पाटील मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत. मात्र, ती वेळ येणार नाही त्या अगोदरच शासन यावर निर्णय घेईल. मराठा समाजातील गरिबांना आरक्षणासाठी स्वतंत्र १५ टक्क्यांचे आरक्षण देण्याबाबतही विचार करण्यात येईल.
केंद्र स्तरावर क्षत्रिय समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठा समाजासह जाट, राजपूत, रेड्डी समाज त्यासाठी आग्रही आहे. दोन ते तीन विभागांत आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी विभाग प्रयत्न करत असल्याचेही आठवले यांनी सांगितले.