वसंतदादा कारखान्यात तपासणी--साडेसात कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 12:20 AM2016-07-29T00:20:42+5:302016-07-29T00:25:12+5:30

साखर चोरी प्रकरण : उत्पादन शुल्क विभागाकडून मागविला खुलासा

Inspection in Vasantdada factory - outstanding amount of Rs. 7.5 crores | वसंतदादा कारखान्यात तपासणी--साडेसात कोटींची थकबाकी

वसंतदादा कारखान्यात तपासणी--साडेसात कोटींची थकबाकी

Next

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील सीलबंद गोदामातून चोरी झालेल्या तीन कोटी ३0 लाख रुपयांच्या साखर चोरीप्रकरणी गुरुवारी संजयनगर पोलिसांनी कारखान्यात जाऊन तपासणी केली. कारखाना व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडून सुरक्षेच्या बाबतीत बेफिकिरी झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी प्रश्नावली तयार करून केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यावर खुलासा करण्याची सूचना दिली आहे.
थकीत अबकारी करापोटी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सील केलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील गोदामातून तीन कोटी ३0 लाखांची साखर चोरीस गेली आहे. विभागाच्या अधीक्षक उषा मौंदेकर यांनी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, चीफ केमिस्ट आणि संजयनगर पोलिसांत रीतसर तक्रार दिली आहे. याप्रकरणी आता तपासाला गती मिळाली आहे. पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, उपनिरीक्षक शिल्पा दुथडे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी कारखान्यात जाऊन, ज्या गोदामातून साखर लंपास झाली आहे, तिथे पाहणी केली. कारखाना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. संशयित कमलाकार गुटे-पाटील, चीफ केमिस्ट व्ही. डी. चव्हाण व गोदाम किपर एस. डी. पाटील यांच्याकडे साखर चोरीच्या काळात कोणती ड्यूटी होती? ते कारखान्यात हजर होते का? यासंदर्भातील रजिस्टर सादर करण्याची मागणी केली आहे. जप्त केलेली साखर सील करून गोदामात ठेवली होती. याठिकाणी रखवालदाराची नियुक्ती केली होती का? सीसीटीव्ही कॅमेरा आहे का? या अनुषंगाने सर्व माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.

साखर स्थलांतर : नोंद आहे का?
पावसाचे पाणी गोदामात शिरल्याने साखरेची पोती अन्य गोदामात स्थलांतरित केल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे. यावर पोलिसांनी, कारखाना प्रशासनाला तशी नोंद केली आहे का, याची विचारणा केली. तसेच स्थलांतर करण्यापूर्वी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेतली होती का? याचीही माहिती पोलिस घेत आहेत. साखर दुसऱ्या गोदामात स्थलांतर केली असेल, तर साखरेची चोरी झाली आहे असे म्हणता येणार नाही. मात्र, गोदामाचे सील फोडणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे याच्या मुळापर्यंत जाऊन तपास करावा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


साडेसात कोटींची थकबाकी
मिरज : केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने साडेसात कोटी रुपये उत्पादन शुल्क वसुलीसाठी वसंतदादा कारखान्याची ३५ हजार क्विंटल साखर ताब्यात घेतली आहे. उत्पादन शुल्क भरणा करीत नसल्याने २०१४ पासून गेली तीन वर्षे उत्पादन शुल्क विभाग वसुलीसाठी कारखान्याच्या साखर गोदामांना सील ठोकत आहे.
साखर कारखान्याकडून साखर उत्पादनावर प्रति टन १९५० रुपये उत्पादन शुल्क वसूल करण्यात येते. प्रति टन ९५० रुपये अबकारी शुल्कात फेब्रुवारीपासून एक हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने साखर उत्पादनापासून उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी दोन कोटी ३५ लाख रुपये अबकारी कर वसुलीसाठी वसंतदादा कारखान्यात १६ हजार क्विंटल साखरेच्या गोदामास सील ठोकण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी नवीन साखर गोदामे सील करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना पूर्वी ताब्यात घेतलेल्या गोदामातील साखर हलविल्याचे आढळले.


थकीत अबकारी कराची सव्वादोन कोटी रुपये रक्कम कारखान्याने गतवर्षी जमा केली. मात्र, चालू वर्षाची साडेसात कोटी रुपये अबकारी कराची रक्कम भरली नसल्याने आणखी ३५ हजार क्विंटल साखरेच्या गोदामांना सील ठोकण्यात आले आहे. पूर्वीची थकबाकी भरली असली तरी उत्पादन शुल्क विभागाने सील काढले नाही. मात्र, शुल्क भरल्यानंतर कारखान्याने सील तोडून साखरेची विल्हेवाट लावल्याचा अंदाज आहे. तीन गोदामांचे सील काढून साखर हलविल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. गोदामातून हलविलेली साखर कारखाना आवारात सापडली नसल्याने साखर चोरीप्रकरणी संबंधितांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेकडून तपासणी
वसंतदादा कारखान्यातील गहाण साखर पोत्यांची तपासणी बुधवारी रात्री जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केली. बँकेच्या ताब्यात असलेली ६0 हजार ७९0 पोती सुरक्षित असल्याची खातरजमा झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल बँक प्रशासनाला गुरुवारी सादर केला. बँकेने कारखान्याला १५ कोटी रुपयांचे माल ताबेगहाण कर्ज दिले आहे. त्यामुळे याठिकाणच्या गोदामात असलेल्या साखरेची तपासणी करण्यात आली.

Web Title: Inspection in Vasantdada factory - outstanding amount of Rs. 7.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.