Sangli: इंधन चोरीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा निरीक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:43 AM2023-11-24T11:43:43+5:302023-11-24T11:44:07+5:30
रेल्वे वॅगनमधून इंधन चोरीबाबत गुन्हा दाखल न केल्याचा ठपका
सांगली : मिरज येथे रेल्वे वॅगनमधून इंधनाची चोरी झाली असतानाही त्याबाबत गुन्हा दाखल न केल्याचा ठपका ठेवत रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षकांना प्रशासनाने निलंबित केले. महेंद्र पाल असे अधिकाऱ्याचे नाव आहे. मिरज येथे वॅगनमधून हजारो लिटर इंधन चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिरज शहरात इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या दोन कंपन्याचे ऑईल डेपो आहेत. यातून पाच जिल्ह्यांना इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. या डेपोमध्ये रेल्वेच्या वॅगनमधून पेट्रोल आणि डिझेल आणण्यात येते.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर मार्गावरून एक वॅगन इंधन घेऊन मिरजेत आली होती. ऑईल डेपोमध्ये वॅगनमधून इंधन काढून घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात फरक असल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासणीत १० ते १२ हजार लिटर इंधन चोरीला गेल्याची बाब समोर आली होती. हा प्रकार लक्षात येताच इंधन कंपनीकडून रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाने या तक्रारीची वेळेत दखल घेतली नव्हती. तसेच इंधन चोरीचा प्रकार गंभीर असतानाही त्याबाबत वरिष्ठांना तत्काळ माहिती देण्यात आली नाही असा ठपका महेंद्र पाल यांच्यावर ठेवण्यात आला होता.
वरिष्ठ कार्यालयाने याची दखल घेत तपासात दिरंगाई, वरिष्ठांना घटनेची माहिती न देणे हा ठपका ठेवत रेल्वे सुरक्षा निरीक्षक महेंद्र पाल यांना निलंबित केले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम असणार आहे. प्रभारी निरीक्षक म्हणून सतवीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंग यांच्याकडून या प्रकरणाचा तपासही होणार आहे.
मिरज येथील चंदनवाडीजवळ असलेल्या ऑईल डेपोमधून यापूर्वीही इंधन चोरीचे प्रकार घडले आहेत. याबाबत पोलिसांसह सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाईही केली होती. पण, या प्रकरणात थेट अधिकाऱ्यालाच निलंबित करण्यात आले आहे.