नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मांदियाळी

By admin | Published: March 18, 2016 11:15 PM2016-03-18T23:15:07+5:302016-03-18T23:31:22+5:30

तासगाव नगरपालिका : आठ महिन्यांचा कालावधी; निर्णयाचा चेंडू खासदारांच्या कोर्टात

Inspiring for the post of mayor | नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मांदियाळी

नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मांदियाळी

Next

दत्ता पाटील -- तासगाव  तासगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष बदलासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सद्यस्थितीत नगराध्यक्ष पदाचा कालावधी आठ महिन्यांचा राहिला आहे. त्यातील एक महिना आचारसंहितेत जाणार आहे. त्यामुळे उर्वरित कालावधित नगराध्यक्ष पदाची संधी मिळविण्यासाठी इच्छुकांची मांदियाळी तयार झाल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीपूर्वी माजी नगराध्यक्षाची बिरुदावली लावण्याचे अनेकांचे मनसुबे असले तरी, निर्णयाचा चेंडू खासदार संजयकाका पाटील यांच्या कोर्टात आहे.
नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सुशिला साळुंखे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यांचा दोन महिन्याचा कार्यकाल पूर्ण झाला, त्यादिवशीच सुशिला साळुंखेंनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. तत्पूर्वी नगराध्यक्ष पदावरुन जोरदार लॉबिंंग झाले होते. नगराध्यक्ष पाटील यांचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. त्यांनी खासदार संजयकाकांचा आदेश आल्याशिवाय राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत भूमिका स्पष्ट केली. नगराध्यक्ष पाटील खुर्चीवर कायम राहण्याची चिन्हे दिसताच, इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली.
गेल्या आठ दिवसांपासून नगरसेकांच्या याबाबत जोरदार हालचाली सुरु आहेत. नगराध्यक्ष बदलाच्या बाजूने पारडे जड करण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी, यासाठी इच्छुकांची धडपड सुरु असून यावेळी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नगरसेवक अविनाश पाटील, अनिल कुत्ते, शरद मानकर, जाफर मुजावर, रजनीगंधा लंगडे, राजू म्हेत्रे यांची नावे चर्चेत आहेत.
इच्छुक असणाऱ्या काही नगरसेवकांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे, तर काहींनी खासदार संजयकाकांनी आदेश दिला, तर नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. एकंदरीत नगराध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी नगरसेवकांच्या पडद्याआड मोठ्या हालचाली सुरु असून शनिवारी खासदार संजयकाका पाटील यांची भेट घेऊन, नव्या नगराध्यक्ष निवडीची मागणी करण्यात येणार आहे.

पक्षप्रतोदांकडे जबाबदारी
नगराध्यक्ष बदल व्हावा, अशी मागणी करणाऱ्या नगरसेवकांत वाढ झाली आहे. यापूर्वी विद्यमान नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांना संधी मिळावी, यासाठी पुढाकार घेणाऱ्या काही नगरसेवकांनीदेखील आता नगराध्यक्ष बदलाची बाजू घेतली आहे. नगराध्यक्ष बदल व्हावा, या मागणीसाठी आठ नगरसेवकांची गोपनीय बैठक झाल्याची चर्चा असून या बैठकीत पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांच्याकडे नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या बैठकीतच शनिवारी खासदार संजयकाकांची भेट घेण्याचा निर्णय झाला आहे.


विद्यमान नगराध्यक्षांना नेमकी किती कालावधीसाठी संधी दिली आहे, याबाबत नगरसेवकांना माहिती नाही. नगराध्यक्ष बदल करुन इतर नगरसेवकांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी, अशी काही नगरसेवकांची इच्छा आहे. याबाबत खासदार संजयकाका पाटील यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी आठ नगरसेवकांनी केली आहे. त्यानुसार शनिवारी मी संजयकाकांची भेट घेऊन नगरसेवकांचे मत सांगणार आहे.
- अनिल कुत्ते, पक्षप्रतोद.

Web Title: Inspiring for the post of mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.