सर्व कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:24 AM2021-05-15T04:24:45+5:302021-05-15T04:24:45+5:30
सांगली : कोरोनाग्रस्त रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार मिळावा म्हणून राज्यातील प्रत्येक काेविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी ...
सांगली : कोरोनाग्रस्त रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार मिळावा म्हणून राज्यातील प्रत्येक काेविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे मिरज तालुका उपप्रमुख अनिल माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
पत्रात माने यांनी म्हटले आहे की, कोणत्याही कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांकडून चांगले उपचार सुरु आहेत, याबद्दल शंका नाही. कोणताही रुग्ण रुग्णालयात दाखल होत असताना भयभीत झालेला असतो. कुटुंबीय व नातेवाईकांपासून तो लांब होतो. बरे होऊन घरी येईपर्यंत त्याला नातेवाईकांशी संपर्क साधता येत नाही. अशावेळी सीसीटीव्ही बसवले तर रुग्णाच्या नातेवाईकाला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. शिवाय रुग्णालाही आपल्याकडे कुटुंबीय पाहताहेत, याचा दिलासा मिळेल.
रुग्णांना मानसिक आधार देणे महत्त्वाचे आहे. याबाबत सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सीसीटीव्ही बसविण्यासाठी अनेक अडचणी असतीलही, मात्र याचा लाभ निश्चितपणे रुग्णांना होईल. भयभीत होऊन जिवाला मुकणाऱ्यांचे प्रमाण यामुळे कमी होऊ शकते. त्यामुळे या मागणीचा विचार करुन राज्यातील सर्वच कोविड सेंटरना त्याबाबत आदेश द्यावेत. रुग्णाचे नातेवाईकांना ते पाहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माने यांनी केली आहे.