सांगलीत २५ जुलैला चातुर्मास कलश स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:57+5:302021-07-23T04:17:57+5:30
सांगली : सकल दिगंबर जैन समाज, जैनाचार्य विद्यासागरजी सामाजिक प्रतिष्ठान व जैनाचार्य विद्यासागरजी जीवदया न्यास यांच्यावतीने नेमिनाथनगर येथील प्रथमाचार्य ...
सांगली : सकल दिगंबर जैन समाज, जैनाचार्य विद्यासागरजी सामाजिक प्रतिष्ठान व जैनाचार्य विद्यासागरजी जीवदया न्यास यांच्यावतीने नेमिनाथनगर येथील प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी संत निवास येथे चातुर्मासनिमित्त पावन वर्षा योग होणार आहे. यानिमित्ताने रविवार, २५ जुलै रोजी कलश स्थापना होणार आहे, अशी माहिती चातुर्मास संयोजन समितीचे मुख्य संयोजक सुरेश पाटील व जैनाचार्य विद्यासागरजी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, प.पु. संतशिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी मुनिराज यांच्या आशीर्वादाने त्यांचे शिष्य प. पू. मुनिश्री १०८ पवित्रसागर महाराज व प.पू. मुनिश्री १०८ सूपार्श्वसागर महाराज यांचा पवित्र पावन वर्षायोग होणार आहे. कलश स्थापना रविवारी दुपारी दीड वाजता होणार आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या या चातुर्मासात धर्म प्रभावनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प. पू. पवित्रसागर व प.पू. मुनिश्री सूपार्श्वसागर महाराज यांचे प्रवचन होणार आहे. पवित्रसागर महाराज हे पूर्वाश्रमीचे जबलपूर-मध्य प्रदेशचे असून, हा ३५ वा चातुर्मास प्रथमच सांगलीत होत आहे. त्यांचा जैन धर्माच्या अहिंसा विषयावरील विशेष अभ्यास असून, प्रभावी प्रवचनकार आहेत. त्यांचा लाभ प्रथमच सांगलीकरांना मिळणार आहे.
मुनिश्री सूपार्श्वसागर महाराज हे पूर्वाश्रमीचे समडोळी येथील असून, त्यांचा धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास आहे. धर्मप्रभावनेवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. या कलश स्थापनेच्या कार्यक्रमाचे लाईव्ह यू-ट्यूबवर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. श्रावक-श्राविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ब्रह्मचारी तात्यासाहेब नेजकर यांच्या मार्गदर्शनाखालील टीममार्फत कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.