मालगाव, सुभाषनगरमध्ये संस्थात्मक विलगीकरण सुुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:51+5:302021-05-05T04:44:51+5:30
मालगाव : कोरोना नियंत्रणासाठी मालगाव व सुभाषनगरमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय झाला. तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्या ...
मालगाव : कोरोना नियंत्रणासाठी मालगाव व सुभाषनगरमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय झाला. तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
कृषी सहायक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य विभागामार्फत कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्याची सूचना तहसीलदार कुंभार यांनी केली. रेशनिंगचे मे व जून महिन्यांचे मोफत धान्य घरपोच देणे, खासगी डाॅक्टरांकडील रुग्णांची यादी बनविणे, त्यांच्या आजाराची नोंद ठेवणे, त्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला दररोज देणे असेही निर्णय झाले. औषध दुकानदारांनी सॅनिटायझर व मास्कची विक्री ना नफा ना तोटा तत्त्वानुसार करावी असे आवाहन करण्यात आले.
दक्षता समितीच्या सदस्यांनी सांगितले की, गावाची लोकसंख्या चाळीस हजार आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने वागावे. यावेळी बटू क्षीरसागर, उपसरपंच तुषार खांडेकर, सदस्य अजित भंडे, मल्लाप्पा कुलकर्णी, सुनील कबाडगे, संजय कुलकर्णी, राजू माळी, झाकीर मुजावर आदी उपस्थित होते.