शहरात अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:23 AM2021-03-24T04:23:54+5:302021-03-24T04:23:54+5:30
सांगली : शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कमी पाणी ...
सांगली : शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कमी पाणी उपसा, काही ठिकाणी ड्रेनेजमुळे तुटलेल्या जलवाहिन्या यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
सांगली शहरात गावभाग, खणभाग, शंभर फुटी रोड, संजयनगर, चिंतामणीनगर, पंचशीलनगर, शिवोदयनगर, लक्ष्मीनगर, अजिंक्यनगर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गावठाणातील ड्रेनेजचे काम पूर्ण झाले असले तरी त्याठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. पहिल्या मजल्यावरही पाणी जात नसल्याने नागरिकांना पाणी साठवण करता येत नाही.
शहराच्या उत्तरेकडील भागात माधवनगरजवळील उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजसाठी खोदाई केल्याने जलवाहिन्या फुटल्या आहेत. ठेकेदाराकडील कामगारांकडून त्याची दुरुस्ती व्यवस्थित होत नाही. त्यामुळे रस्ते मुरुमाने भरल्यानंतर जलवाहिन्या पुन्हा फुटत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्या भागात जलवाहिन्यांना अडचण नाही, अशा भागात पाणीपुरवठा विभागामार्फत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे.
चौकट
महापालिकेकडे यंत्रणा अपुरी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सध्या अपुरी यंत्रणा आहे. कमी कर्मचारी असल्याने दुरुस्तीची कामे तातडीने होत नाहीत. याशिवाय पाण्याचे टँकरही कमी असल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करणेही मुश्कील आहे.
काेट
गेल्या अनेक दिवसांपासून गावभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. कुंभारखिंडीजवळ व्हॉल्व लिकेज असल्याचे सांगितले जात असले तरी त्याची दुरुस्ती तातडीने होत नाही. नागरिकांनी किती दिवस हा त्रास सहन करायचा.
- संजय चव्हाण, नागरिक, गावभाग