महात्मा गांधींचा अवमान: भाजपच्या खासदारांकडून संभाजी भिडेंचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 04:00 PM2023-08-01T16:00:35+5:302023-08-01T16:01:33+5:30
समाजात अशा प्रकारातून दुही पसरविण्याचे काम कोणी करू नये
सांगली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. सत्य व अहिंसेच्या मार्गाचा पुरस्कार करणारे महात्मा गांधी भारतातच नव्हे, तर जगात पूजनीय आहेत. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानाचा निषेध करतो, असे भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा गांधी यांची बदनामी, अपमान करणाऱ्यांचा प्रयत्न निंदनीय आहे. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचे योगदान व त्यांच्या तत्त्वांचा जगाने केलेला स्वीकार पाहता त्यांच्याबद्दल अवमानकारक बोलणे अयोग्य आहे. समाजात अशा प्रकारातून दुही पसरविण्याचे काम कोणी करू नये.
टेंभू योजनेबाबत ते म्हणाले की, टेंभूची विस्तारित उपसा सिंचन योजना ७३७० कोटींची असून यात सांगली जिल्ह्यातील २४०० कोटींच्या कामांचा समावेश आहे. या योजनेच्या सुधारित प्रस्तावास येत्या आठ दिवसांत शासनाची मंजुरी मिळेल. जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील गावांना योजनेचा लाभ होणार आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजना टंचाई संपेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
लॉजिस्टिक पार्कसाठी अडचण नाही
खासदार म्हणाले की, मल्टीलॉजिस्टिक पार्क मिरज तालुक्यातील सलगरे येथेच होणार आहे. हा विषय जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे नसून नॅशनल हायवे ॲथॉरिटीकडे आहे. या पोर्टसाठी सलगरे येथील ५५० ते ६०० एकर जमीन राज्य शासन एमआयडीसीकडे हस्तांतरित करणार आहे. ही जागा एका मागासवर्गीय संस्थेला एक वर्षाच्या कराराने दिली होती. कराराची मुदत संपली असून संस्था अवसायनात निघाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर सुनावणी सुरू आहे.