विटा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:19+5:302021-04-26T04:23:19+5:30
विटा : विटा शहर व खानापूर तालुक्यातील अनेक गावांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काहींचा मृत्यू होत आहे. ...
विटा : विटा शहर व खानापूर तालुक्यातील अनेक गावांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काहींचा मृत्यू होत आहे. या सर्व कोरोना मृतदेहावर विटा नगरपालिकेचे कर्मचारी जीवाची बाजी लावून अंत्यसंस्कार करीत आहेत, त्यामुळे स्वतःची व कुटुंबाची काळजी न करता अहोरात्र अंत्यसंस्कारचे काम करणाऱ्या विटा नगरपालिका कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा चोथे यांनी दिली.
त्या म्हणल्या, विटा नगर परिषदेच्यावतीने योग्य नियोजन करून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य नगरपालिकेच्यावतीने पुरवले जात आहे. अंत्यसंस्कार ही सामाजिक बांधीलकी पार पाडणारे नगर परिषदेचे कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जोखमीचे काम जनहित व सेवाभावी वृत्तीने पालिकेचे कोरोना योद्धे करीत आहेत. कोरोनाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्याचे जोखमीचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्याचा व भविष्याचा विचार करून त्या सर्वांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.
नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपनगराध्यक्षा सारिका सपकाळ व मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या सहकार्याने सर्व पथक काम करीत आहे. सध्या लसीकरणाचे काम सुरू आहे. महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी सभापती प्रतिभा चोथे यांनी केले.