कोरोना काळात विटा येथील पत्रकारांना विमा संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:06+5:302021-06-02T04:21:06+5:30
विटा : कोरोनाच्या महासंकटात फ्रंटलाईन वर्कर म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत असलेल्या पत्रकारांसाठी विटा येथील श्री राजलक्ष्मी ...
विटा : कोरोनाच्या महासंकटात फ्रंटलाईन वर्कर म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत असलेल्या पत्रकारांसाठी विटा येथील श्री राजलक्ष्मी उद्योग समूह आणि आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना महामारीत काम करीत असलेल्या विट्यातील २३ पत्रकारांना विमा संरक्षण दिले आहे.
विट्यातील २३ पत्रकार, शहरातील कोविड रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतांवर अत्यसंस्कार करणाऱ्या अशा सुमारे ११५ कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले. या विमा पॉलिसीचे वितरण विटा येथे सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे व मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्याहस्ते केले.
विटा शहरासह खानापूर तालुक्यात वाढत्या कोरोना संसर्गात पत्रकार फ्रंटलाईन वर्कर म्हणून समाजासाठी काम करीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधार म्हणून विटा येथील युवा उद्योजक डॉ. शंकर बुधवानी यांच्या श्री राजलक्ष्मी समूह आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असलेल्या विटा येथील आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विट्यातील पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
माजी नगरसेवक प्रशांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास राजलक्ष्मी समूहाचे डॉ. शंकर बुधवानी, विकास जाधव, माधव रोकडे, अमित भोसले, विनोद पाटील, रोहित पाटील, संभाजी होगले, संग्राम माने, पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.