व्याजाने दिले २३ लाख, मागितले ९५ लाख, तिघे सावकार पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 01:01 PM2021-12-25T13:01:57+5:302021-12-25T13:03:49+5:30

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याला २३ लाख रुपये सावकारी व्याजाने देऊन त्यापोटी ९५ लाखांची मागणी करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची दिली धमकी.

Interest paid Rs 23 lakh demanded Rs 95 lakh three moneylenders caught by police in Islampur | व्याजाने दिले २३ लाख, मागितले ९५ लाख, तिघे सावकार पोलिसांच्या जाळ्यात

व्याजाने दिले २३ लाख, मागितले ९५ लाख, तिघे सावकार पोलिसांच्या जाळ्यात

Next

इस्लामपूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याला २३ लाख रुपये सावकारी व्याजाने देऊन त्यापोटी ९५ लाखांची मागणी करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासगी सावकारांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यातील तिघा सावकारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर, एकाने दुचाकी नावावर करून घेतली आहे. पोलिसांच्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत बाजीराव दिनकर पाटील (वय ५४, रा. रक्तपेढीजवळ, इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. बालम जमादार (वाघवाडी), संभाजी पवार (होळकर डेअरीजवळ, इस्लामपूर) आणि धनंजय मोरे (इस्लामपूर) या तीन सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांशिवाय जगन्नाथ किसन चिखले (नवेखेड), सुजित पाटील (इस्लामपूर), धैर्यशील पाटील, ज्ञानदेव जाधव (सातवे), पवार (वाळवा,पूर्ण नाव नाही) यांच्यासह तीन व्यापारी आणि एक कापड दुकानदार अशा १२ जणांच्या सावकारी टोळीविरुद्ध लूटमार आणि खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील सर्व संशयितांनी आपला गट करून कनिष्ठ अभियंता बाजीराव पाटील यांना ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ठरावीक सावकारी व्याजाने २२ लाख ९० हजार रुपये दिले होते. यातील संभाजी पवार याच्याकडून ९० हजार रुपये घेतले होते. त्याला व्याजापोटी ७२ हजार ४०० रुपये देऊनही त्याने पाटील यांची दुचाकी (क्र. एमएच १० एए ६१९१) जबरदस्तीने काढून घेतली आहे. तसेच कोऱ्या टीटी अर्जावर सह्या घेतल्या आहेत. तर, ज्ञानदेव जाधव याला ३ लाखापोटी १ लाख १४ हजार रुपये व्याज दिले. मात्र त्याच्याकडून आणखी ३ लाख ६० हजार रुपयांची मागणी होत होती. त्याने पाटील यांना नोकरी घालवण्याचीही धमकी दिली होती.

या सर्व प्रकारात या सावकारांनी वेळोवेळी घरी येऊन आणि मोबाईल फोनवरून ९५ लाखांच्या रकमेची मागणी करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी गतीने हालचाली करून या सावकारांच्या गटातील तिघांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.

Web Title: Interest paid Rs 23 lakh demanded Rs 95 lakh three moneylenders caught by police in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.