वसंतदादा बँकेच्या मुख्यालय खरेदीस महापालिका इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 04:06 PM2019-04-11T16:06:03+5:302019-04-11T16:07:10+5:30
अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या सांगली-मिरज रस्त्यावरील मुख्यालयासह मुंबईतील इमारतही लिलावात काढण्यासाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सहकार विभागाकडून मंजुरी मिळताच दोन्ही इमारतींच्या विक्रीची
सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या सांगली-मिरज रस्त्यावरील मुख्यालयासह मुंबईतील इमारतही लिलावात काढण्यासाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सहकार विभागाकडून मंजुरी मिळताच दोन्ही इमारतींच्या विक्रीची प्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे. दरम्यान, सांगलीतील मुख्यालयाची जागा घेण्यासाठी महापालिकाही इच्छुक आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर प्राथमिक चर्चा सुरू असून, महासभेने साथ दिल्यास इमारत महापालिकेच्या मालकीची होऊ शकते.
वसंतदादा बॅँकेची सांगली-मिरज रस्त्यावर भव्य व काचेची मोठी इमारत आहे. आकर्षक रंगसंगतीत रंगलेली आलिशान कार्यालये, वतानुकूलित यंत्रणा, लिफ्ट अशा सर्व सेवासुविधांनीयुक्त अशी ही बॅँक अन्य खासगी बॅँकांच्या तुलनेत सर्वात चर्चेत होती. अमर्याद व असुरक्षित कर्जवाटपाने बॅँकेला अधोगतीचा मार्ग दाखविला. अखेर ही बॅँक अवसायनात काढण्यात आली. रिझर्व्ह बॅँकेमार्फत वसंतदादा बॅँकेचा परवानाही निलंबित झाला. त्यानंतर मुख्यालयाच्या इमारतीतही निराशेचे वारे वाहू लागले.
चारशेहून अधिक कर्मचारी असलेल्या या बॅँकेतील अनेकांच्या नोकºया गेल्या. कर्मचारी कपात होत होत आता इतक्या मोठ्या इमारतीमध्ये केवळ २२ कर्मचारीच काम करीत आहेत. राज्यातील एकूण शाखांचा विचार केला, तर सध्या केवळ २८ जणांचाच स्टाफ आहे. सांगलीच्या मुख्यालयाची घरपट्टी, विद्युत बिले व अन्य खर्च करणेही जिकिरीचे होत असून, कर्मचारी वर्गही कमी झाल्याने मुख्यालय विक्रीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सहकार विभागाकडे गेला आहे.