आंतरजातीय लग्न केलेली ती बाळंतीण गेली घरी

By admin | Published: March 13, 2017 01:42 PM2017-03-13T13:42:44+5:302017-03-13T13:42:44+5:30

बिलाची घेतली हमी : ‘लोकमत’ मधील आवाहनास प्रतिसाद

The intern has got a baby girl | आंतरजातीय लग्न केलेली ती बाळंतीण गेली घरी

आंतरजातीय लग्न केलेली ती बाळंतीण गेली घरी

Next

आंतरजातीय लग्न केलेली ती बाळंतीण गेली घरी
बिलाची घेतली हमी : ‘लोकमत’ मधील आवाहनास प्रतिसाद
कोल्हापूर : उपचाराचे बिल भागवता येत नाही म्हणून रुग्णालयात थांबावे लागलेल्या विवाहितेला चिमुकल्या मुलीसह रविवारी सायंकाळी डिस्चार्ज मिळाला. बिल भरण्याची लेखी हमी भारतीय महिला फेडरेशनच्या मेघा पानसरे यांनी दिली. त्यानंतर संबंधित विवाहितेच्या पतीने १५ हजार रुपये रोख भरल्यानंतर त्यांना घरी जावू देण्यात आले. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ मध्ये १२ मार्चला प्रसिध्द झाले. ते वाचूनही कांही संवेदनशील लोक मदतीसाठी पुढे आले.
मुळचे हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील. मुलगा नवबौध्द तर मुलगी लिंगायत समाजातील. त्यांनी गेल्यावर्षी आंतरजातीय लग्न केले. तेव्हापासून त्यांना दोन्ही कुटुंबांनी वाळीत टाकले आहे. त्यात संबंधित विवाहिता गरोदर झाली. गरोदरपणातच तिला कावीळची लागण झाली. त्यामुळे प्रसूती गुंतागुंतीची झाली. डॉक्टरांच्याच सल्ल्याने तिला येथील राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर चांगले उपचार केले. त्यामुळे दोघांच्याही जीवाला कोणताही धोका न पोहचता प्रसूती झाली. या उपचाराचे बिल ४८ हजार रुपये झाले. तिचा पती रंगारीची कामे करतो. त्यामुळे त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्यांना कुणीतरी मेघा पानसरे यांचे नांव सुचविले. खासदार धनंजय महाडिक यांनी विनंती केल्यावर रुग्णालय प्रशासनाने पाच हजार रुपये बिल कमी केले. तरीही उर्वरित ४३ हजार रुपयांचा प्रश्र्न होता. रविवारी होळीचा सण होता. शिवाय त्या बाळंतिणीजवळ राहायलाही कुणी नव्हते. त्यामुळे कांहीही करुन आम्हांला घरी जावू द्या अशी विनवणी ती वारंवार करत होती. तिची अगतिकता लक्षात घेवून मेघा पानसरे, महिला दक्षता समितीच्या सचिव तनुजा शिपूरकर, सानिका शिपूरकर, ‘लोकमत’ चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील हे रुग्णालयात जावून डॉक्टरांना भेटले व २० मार्चपर्यंत पैसे देण्याची हमी घेत असल्याचे त्यांना सांगितले, तसे लेखी पत्र दिले. त्याचवेळी भोगावती हायस्कूलमधील शिक्षक डी. एल. कांबळे व प्रा. आर. व्ही. गायकवाड तिथे आले. त्यांनीही कांही रक्कम देण्याचे आश्वासन दिले. पानसरे यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण हेंद्रे यांना ही वस्तुस्थिती सांगितल्यावर त्यांनी असोसिशनतर्फे दहा हजार रुपये देण्याचे मान्य केले. माजी आमदार नानासाहेब माने यांनी स्वत: दूरध्वनी करून ५ हजार रुपयांचा धनादेश पाठवून देतो असे सांगितले. मिलिंद धोंड यांना हे समजल्यावर त्यांनी आपण ५ हजार रुपये देत असल्याचे सांगितले. जेवढी रक्कम जमा होईल त्यातून बिल भागवून उर्वरित रक्कम तिच्या मुलीच्या नावांवर ठेव ठेवण्याचा निर्णय झाला.
---------------------
सरकारी योजनेपासून वंचित
संबंधित विवाहिता बाळंतपणासाठी सीपीआर किंवा सरकारने घोषित केलेल्या रुग्णालयात दाखल झाली असती तर तिच्यावर मोफत उपचार झाले असते. खासगी रुग्णालयात उपचार झाल्यास त्यासाठी स्वतंत्र कोणतीही योजना नसल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी सांगितले. गर्भातच मुली खुडण्याचा आटापिटा सुरु असताना या विवाहितेस सुंदर मुलगी झाली आहे. मुलगी वाचवा म्हणून शासन मोहिम राबविते परंतू अशा अडचणीतील प्रसंगात मात्र शासनाची मदत मिळणे म्हणजे दिव्यच ठरते.
.

Web Title: The intern has got a baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.