मिरजेतील तंतुवाद्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:42 AM2021-02-23T04:42:25+5:302021-02-23T04:42:25+5:30
मिरज : मिरजेतील सतार व इतर तत्सम वाद्ये, तंतुवाद्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग आवश्यक असून त्यासाठी कारागिरांनी केंद्रीय वस्त्रोद्योग व ...
मिरज : मिरजेतील सतार व इतर तत्सम वाद्ये, तंतुवाद्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग आवश्यक असून त्यासाठी कारागिरांनी केंद्रीय वस्त्रोद्योग व हस्तकला मंत्रालयातर्फे आयोजित कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य जीएसटी सांगली विभागाच्या उपायुक्त शर्मिला मिस्कीन यांनी केले.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे मिरजेत तंतूवाद्य कारागिरांसाठी आयाेजित कार्यशाळेचे उद्घाटन मिस्कीन यांनी केले. याप्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग व हस्तकला मंत्रालय, कोल्हापूर कार्यालयाचे सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंह, केंद्रीय जीएसटी सांगली विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, बाळासाहेब मिरजकर, खादी ग्रामोद्योगचे रवींद्र बुचडे, बापूसाहेब चव्हाण उपस्थित होते.
मिस्कीन म्हणाल्या, संगीताची मोठी परंपरा असलेल्या मिरज नगरीत अशी कार्यशाळा तंतुवाद्य कारागिरांसाठी उपयुक्त आहे.
चंद्रशेखर सिंह म्हणाले, नावीन्यपूर्ण पद्धतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून केंद्र शासनाचे अधिकारी मिरज संगीत नगरीत येऊन कारागिरांना प्रशिक्षण देणार आहेत. पारंपरिक निर्मिती प्रक्रियेसोबत आधुनिक निर्मिती प्रक्रियेचे प्रशिक्षण तंत्रज्ञांकडून देण्यात येणार आहे. कार्यशाळेचा लाभ येथील अनेक तंतुवाद्य कारागिरांना होणार आहे.
तंतुवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर म्हणाले, मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांसाठी ही कार्यशाळा एक संधी असून नवीन तंत्रज्ञानामुळे निर्मितीचा दर्जा उच्चतम राहील यासाठी प्रयत्न करु.
कार्यशाळेत मोठ्या प्रमाणावर कारागीर सहभागी होते. कारागिरांना गुणवत्तेवर आधारित प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार आहेत. मोहसिन मिरजकर, हैदर सतारमेकर, अल्ताफ पिरजादे, दिनेश कलगुडगी, विरेश संकाजे यांनी संयोजन केले.