कवठेएकंदच्या शाळांना आंतरराष्ट्रीय मान्यता, जिल्हा परिषदेच्या शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:56 PM2019-03-29T13:56:40+5:302019-03-29T13:58:06+5:30
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.
प्रदीप पोतदार
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण पटसंख्या, कौशल्यपूर्ण अध्यापक वर्ग, शैक्षणिक कार्यात लोकांचा उत्स्फूर्त सहभाग, शैक्षणिक उठावातून भरीव कामगिरी यामुळेच जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा क्र. १ व जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा क्र. २ या शाळांना आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीकडून गेल्या वर्षभरात विविध निकषांवर वेगवेगळ्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कवठेएकंद जिल्हा परिषद शाळांचे सादरीकरण चांगल्याप्रकारे झाले होते. जिल्ह्यातील चार शाळा पात्र ठरल्या होत्या. नुकतीच महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पाहणी पथकाने भेट देऊन स्थानिक पातळीवरील अनेक घटकांची पाहणी केली.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्याशी संवाद साधून मुलाखती घेतल्या. दरम्यान, येथील भौगोलिक स्थिती, भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी संख्या, लोकसहभाग, दळणवळण याबाबतीत मूल्यमापन केले. याअनुषंगाने २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयइबी) अस्थायी संलग्नता मिळाली असून, पूर्व प्राथमिक ते चौथीची मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षण व माहिती देण्यात येणार आहे.
लोकसहभागातून इमारत
सर्व शिक्षा अभियानांतर्गत कवठे एकंद येथे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा इमारत उभारण्यात आली आहे. सुमारे २९ लाख रुपये शासकीय अनुदानाबरोबर सुमारे ३४ लाख रुपयांची लोकवर्गणी संकलित करून गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटविला.
या आहेत सुविधा...
तीनमजली टोलेजंग इमारत गावच्या शैक्षणिक सुविधेसाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हरांडा व सुरक्षितरित्या ग्रील, ग्रॅनाईट फरशी, आकर्षक रंगरंगोटी यामुळे देखणे स्वरूप इमारतीस प्राप्त झाले आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल वर्ग, संरक्षक भिंत, सुलभ शौचालय, बाथरूमसह स्वच्छ पाणी पुरवठा सोय अशी कामे प्रस्तावित आहेत.