‘वालचंद’मध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
By admin | Published: December 8, 2014 11:50 PM2014-12-08T23:50:15+5:302014-12-09T00:27:50+5:30
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग दिल्ली आणि मॅक्स प्लॅक संस्था, जर्मनी यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे
सांगली : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘ए विन्टर स्कूल आॅन अलगॉरिदमिक गेम थेअरी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेस आज सोमवारी प्रारंभ झाला. आय. आय. टी., दिल्लीचे प्रा. नवीन गर्ग यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात प्रथमच जागतिक पातळीवरील कार्यशाळा सांगलीत होत आहे. यासाठी देशातील विविध आय. आय. टी. तसेच इतर मान्यवर संस्थेमधील सुमारे ७० प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग दिल्ली आणि मॅक्स प्लॅक संस्था, जर्मनी यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. मिलिंद सोहनी (मुंबई), प्रा. जुगल गर्ग (जर्मनी), प्रा. सयन भट्टाचार्य (चेन्नई), प्रा. निकोल लिमारिसा (इंग्लड) हे उपस्थित राहणार आहेत.
वालचंद महाविद्यालयाचे डॉ. जी. व्ही. परिशवाड, संचालक डॉ. पी. जे. कुलकर्णी, उपसंचालक डॉ. एस. पी. चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन माहिती तंत्रज्ञान विभागाचे डॉ. दिनेश कुलकर्णी, डॉ. शेफाली सोनवणे आणि डॉ. संतोष जोशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)