आंतरवासिता डॉक्टर्स पाऊण तासाच्या ‘ब्रेक’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:16+5:302021-06-01T04:20:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आंतरवासिता डॉक्टरांनी सोमवारी संध्याकाळी काही मिनिटांचे मौन पाळले, शिवाय काळ्या फिती लावून काम केले. ...

Internship doctors on a half hour break | आंतरवासिता डॉक्टर्स पाऊण तासाच्या ‘ब्रेक’वर

आंतरवासिता डॉक्टर्स पाऊण तासाच्या ‘ब्रेक’वर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आंतरवासिता डॉक्टरांनी सोमवारी संध्याकाळी काही मिनिटांचे मौन पाळले, शिवाय काळ्या फिती लावून काम केले. रुग्णसेवेेत असणारे डॉक्टर्सही पाऊण तासाचा ब्रेक घेऊन यामध्ये सहभागी झाले.

लातूर येथे आंतरवासिता डॉक्टर राहुल पवार यांचा कोरोनाने मृत्यू झाला. तब्बल २६ दिवस त्यांनी कोरोनाशी संघर्ष केला. त्यांच्या मृत्यूनंतरही शासनाने ५० लाखांच्या मदतीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नच्या सदस्यांनी केली. गेल्या २६ एप्रिल रोजी एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या डॉ. राहुल यांच्या मृत्यूने कुटुंब हादरले आहे. कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्यास शासनाने वाऱ्यावर सोडू नये ही असोसिएशनची प्रमुख मागणी आहे.

त्यासाठी सोमवारी व मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता पाऊण तासाचा ब्रेक घेऊन मौन पाळण्यात येत आहे. खासगी व शासकीय महाविद्यालयांतील आंतरवासिता डॉक्टर्स यामध्ये सहभागी होत आहेत. सांगलीत मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भारती वैद्यकीय महाविद्यालय व इस्लामपुरातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स सहभागी झाले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात ८५ डॉक्टर्स व सांगलीत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात ६४ डॉक्टर्सनी काही मिनिटांचा ब्रेक घेऊन मौन पाळले. काळ्या फिती लावल्या. यादरम्यान, रुग्णसेवा मात्र विस्कळीत होऊ दिली नाही. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संकेत सोनवणे, डॉ. जय शाह, डॉ. सागर पवार, डॉ. राजेश्वर गजबरकर, मिहीर चिटणीस आदींनी नेतृत्व केले.

चौकट

आंतरवासिता डॉक्टरांची दुखणी

शासनाकडून मृत्यूपश्चात ५० लाखांच्या मदतीची लेखी हमी नाही. कोविड आणि नॉनकोविड रुग्णांवर उपचार, लसीकरण अशा कामांचा ताण असतानाही वेतन मात्र अत्यल्प आहे. बाहेरून येणाऱ्या डॉक्टरांना प्रवास खर्च तसेच वसतिगृहातील आंतरवासिता डॉक्टरांसाठी जेवणाचा खर्च मिळत नाही. खासगी आंतरवासिता डॉक्टरांनाही वेतन व संरक्षण नाही.

Web Title: Internship doctors on a half hour break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.